राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थ येथे पार पडला. या सभेत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा हुंकार भरला. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यांना हात घातला. तर मदरशांवर धाडी टाकण्याबाबत त्यांनी केंद्र सरकारला आवाहन केले.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी हिंदूत्वा विषयीची आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचाही चांगलाच समाचार घेतला अँटिलिया प्रकरण, जेल मधील मंत्री, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची आत्महत्या, आमदारांना मिळणारी घरे या सर्व प्रकरणांवरून राज ठाकरे यांनी मविआ सरकारवर तोफ डागली. तर याच वेळी त्यांनी मदरशांवर धाडी टाकाव्यात असे केंद्र सरकारला उद्देशून सांगितले. “मी केंद्र सरकारला विनंती करतो की महाराष्ट्रात ज्या प्रमाणे ईडीच्या धाडी सुरू आहेत तशाच धाडी मदरशांवर टाकाव्यात. महाराष्ट्रातल्या पोलिसांना याबद्दल सगळी माहिती आहे. बेहराम पाडा, मुंब्रा वगैरे ठिकाणच्या मदरशांमध्ये काय काय गोष्टी सापडतील आपण कल्पनाही करू शकत नाही, इतक्या गोष्टींची साठवणुकीत करून ठेवण्यात आली आहे. पाकिस्तानला आपल्या देशा विरोधात काही करायची गरज देखील नाही, आपल्या देशातच इतकं काय काय आहे असे राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी
‘या’ कारणामुळे इन्फोसिस रशियातील सर्व कार्यालये बंद करणार?
राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उडविल्या चिंधड्या
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांचे लोकार्पण
तर याच वेळी राज ठाकरे यांनी मशीदींवरील भोंग्यांच्या प्रश्नाला हात घातला. राज्यातील मशीदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत. जेव्हा धर्म स्थापन झाला तेव्हा लाऊडस्पीकर अस्तित्वात होते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. तर देवाची प्रार्थना करायला माझा विरोध नाही. पण ती भोंग्यांवरून का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर हे भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर एकत्रित येऊन हनुमान चालीसा म्हणा असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज ठाकरे यांच्या आजच्या भाषणातून पुन्हा एकदा त्यांना अभिप्रेत असलेले आक्रमक हिंदुत्व दिसून आले. त्यामुळे आगामी काळात भोग्यांचा प्रश्न घेऊन मनसे मार्फत एखादे आंदोलन पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.