मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या या २ अ आणि ७ या दोन मार्गिकांचे लोकार्पण झाले आहे. यमुख्यमंत्र्यांनी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आहे. तर यानंतर त्यांनी या मेट्रोमधून प्रवासही केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राजचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, अस्लम शेख हे देखील उपस्थित होते.
शनिवार, २ एप्रिल अर्थात साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन मार्गांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत हे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोमधून प्रवास देखील केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोचे पहिले तिकीट काढले.
आरे ते कुरार अशा तीन स्थानकांचा हा प्रवास मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी मंत्रिमंडळातले इतर सहकारीही त्यांच्यासोबत उपस्थित होते. दहिसर ते आरे अशा मार्गावर मेट्रो ७ धावणार आहे. तर मेट्रो २ अ चा मार्ग आरे ते डहाणूकरवाडी असणार आहे.
हे ही वाचा:
भारतात मार्चमध्ये उष्णतेचा विक्रमी पारा
मोदी म्हणाले आगामी वर्षात सर्व मनोकामना पूर्ण होवोत
‘त्या’ घटनेनंतर विल स्मिथने हॉलिवूडच्या अकादमीचा दिला राजीनामा
या संपूर्ण कार्यक्रमाचे श्रेयवादाचे राजकारण पहायला मिळाले. मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेखही करण्यात आला नव्हता. वास्तविक मेट्रोचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झाले आणि बरेचसे काम त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले होते. अशातच या मेट्रोचे श्रेय त्यांना मिळू नये यासाठी ठाकरे सरकारने निमंत्रण पत्रिकेतूनच त्यांचे नाव गायब केल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. त्यामुळे भाजपाने या संपूर्ण कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचे पाहायला मिळाले. तर ‘मुंबईकरांना माहिती काम कोणी केलं’ अशा प्रकारचे बॅनर भाजपाने लावल्याचेही दिसले.