आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारत आज, २ एप्रिलला ४० हजार टन डिझेल श्रीलंकेला पाठवणार आहे. श्रीलंकेतील शेकडो इंधन केंद्रांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ज्यांना गेल्या काही दिवसांपासून पुरवठा झाला नव्हता, अशी माहिती सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सुमित विजेसिंघे यांनी दिली आहे.
भारत आज संध्याकाळपासून श्रीलंकेला या इंधनाचा पुरवठा होणार आहे. तसेच भारतातून श्रीलंकेला ४० हजार टन तांदळाची खेप पाठवण्याची तयारीही सुरू आहे. भारताकडून श्रीलंकेला देण्यात येणारी ही पहिली मोठी अन्न मदत असेल. या मदतीमुळे गेल्या वर्षभरात श्रीलंकेत दुपटीने वाढलेल्या अन्नधान्याच्या किमती कमी करण्यात श्रीलंकेतील सरकार काही प्रमाणात यशस्वी होईल, असा विश्वास भारताला आहे.
अॅग्रो फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक बीव्ही कृष्णा राव म्हणाले की, “आम्ही प्रथम डिझेलचा कंटेनर लोड करत आहोत. काही दिवसात जहाज लोड करण्याची प्रक्रिया सुरू होईल. भारत आणि श्रीलंका सरकारमधील क्रेडिट सुविधा करारांतर्गत भारत श्रीलंकेला तांदूळ पुरवठा देखील करणार आहे. ”
हे ही वाचा:
‘त्या’ घटनेनंतर विल स्मिथने हॉलिवूडच्या अकादमीचा दिला राजीनामा
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झाला ‘ऐतिहासिक’ करार
देशभर सुरु देवीचा जागर! चैत्र नवरात्राला प्रारंभ
श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहे. अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव येथे गगनाला भिडले आहेत. या आठवड्यात श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून, भरणा केंद्रांवर सशस्त्र सैनिक तैनात करावे लागले आहेत. तसेच येथे तब्बल तेरा तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आर्थिक संकटावर देशभरात सुरू असलेल्या निदर्शने दरम्यान देशव्यापी सार्वजनिक आणीबाणी जाहीर केली आहे.