राज्यात आज सर्वत्र हिंदू नववर्षाचा अर्थातच गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्य कोरोना निर्बंधांतून मुक्त झाल्यापासून हा पहिलाच सण आल्यामुळे मोठ्या उत्साहात नागरिक त्याचे स्वागत करताना दिसत आहेत. पण अशातच राज्याच्या राजकीय वर्तुळात मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दादरमधील शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज पार पडत आहे. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते हे या मेळाव्यासाठी दादरच्या दिशेने निघाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून ते नेमके काय बोलणार याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाच्या नजरा आहेत.
हे ही वाचा:
श्रीलंकेत परिस्थिती चिघळली; आणीबाणी लागू
आर्यन खान प्रकरणातला पंच प्रभाकर साईल मृत्युमुखी
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झाला ‘ऐतिहासिक’ करार
राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष….
राज्यात होऊ घातलेल्या आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मनसेसाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यातून कोरोनाचे निर्बंध हटवल्यामुळे या मेळाव्यालाही मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर गेल्या काही काळापासून राजकीय कार्यक्रमांवरही निर्बंध असताना आता राज्य निर्बंधमुक्त झाल्यामुळे हा मोठा मेळावा पार पडणार आहेत.
आजच्या आपल्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मराठीच्या मुद्यावरून मनसे आता हिंदुत्वाच्या दिशेने झुकताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर दसरा मेळाव्याला सुरुवात केली. त्याचप्रमाणे त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा सुरू केला. आजच्या मेळाव्यात राज ठाकरे हे कदाचित आगामी अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.