पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १ एप्रिल रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांना, प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना समजतील अशी उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं.
ऑनलाईन अभ्यास करताना लक्ष विचलित होतं, अशी तक्रार काही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “तुम्ही विचार करा की, तुम्ही ऑनलाईन वाचत असता की रिल्स पाहत असता? मी तुम्हाला हात वर करायला लावणार नाही. पण तुम्हाला कळलं की मी तुम्हाला पकडलंय. खरंतर दोष ऑनलाईन किंवा ऑफलाईनचा नाही. तुम्ही अनुभव घेतला असेल वर्गातही अनेकदा तुमचं शरीर वर्गात आहे, डोळे शिक्षकांकडे आहेत पण एकही गोष्ट कानात जात नसते. कारण तुमचं मन कुठेतरी दुसरीकडे असतं. ज्या गोष्टी ऑफलाईन होतात, त्याच गोष्टी ऑनलाईन होतात. याचा अर्थ माध्यम ही समस्या नसून मन ही समस्या आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
युग बदलल्यावर माध्यमही बदललं. शिक्षकांनी दिलेल्या नोट्स आणि ऑनलाईन मिळालेल्या नोट्स दोन्ही वाचल्या तर ज्ञानात आणखी भर घालू शकाल. ज्ञान मिळवून स्वतःला घडवण्यासाठी ज्ञानाचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी एक उदाहरणही दिलं. “तुम्ही ऑनलाईन डोसा तयार कराल, मस्त डोसा तयार कराल पण त्याने पोट भरेल का? पण हेच जर डोसा कसा बनवायचा हे ऑनलाईन पाहिलं आणि प्रत्यक्षात डोसा बनवला तर त्याने पोट भरेल. ज्ञानाचंही असंच आहे. ऑनलाईनचा आधार घेऊन तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे आणि ते ज्ञान तुमच्या जीवनात वापरायचं आहे,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
हे ही वाचा:
दिलीप वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! काँग्रेस-शिवसेना गृह खात्यावर नाराज असल्याची चर्चा
श्रीलंकेत आर्थिक संकटाचा निषेध; राजधानी कोलंबोत कर्फ्यू
किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर
‘श्रेयवादाच्या नादात अपयशाचं खापर ठाकरे सरकारवर फुटेल’
डिजिटल यंत्रांमधून खूप काही सध्या करता येतं पण याला संधी मानायला हवी समस्या नाही. एखाद्या गोष्टीत मेहनत कमी पडली असेल तर त्यात एवढं काय घाबरून जायचं? आत्मविश्वास असेल तर बाकीच्या गोष्टी पूर्ण होतात, असे अनेक सल्ले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना दिले.