इलेक्ट्रिक वाहने, उपकरणे यांत सर्रास वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन आता देशांतर्गत करणे शक्य आहे. पुणे स्थित सी-मेटच्या शास्त्रज्ञांनी संपूर्ण स्वदेशी पदार्थांचा वापर करून देशी बनावटीची बॅटरी तयार केली आहे. पूर्वी या बॅटरीची मोठ्या प्रमाणात आयात होत होती. आत्मनिर्भरतेमुळे आता देशाच्या मूल्यवान विदेशी चलनाची बचत होईल.
भारतात इलेक्ट्रिक गाड्यांना मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक गाड्या, घड्याळे, मोबाईल फोन इत्यादी सर्व उपकरणांत लिथियम आयन बॅटरीचाच वापर होतो. आजवर आपण या बॅटरी चीनमधून आयात करत होतो २०२१ पर्यंत या बॅटरीची बाजारपेठ १ हजार ४०० अब्ज रुपये एवढी वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या बॅटरीचे उत्पादन भारतात होणे आवश्यक होते. दै.सकाळने दिलेल्या वृत्तानुसार “प्रथमच लिथियम आयन बॅटरी पूर्णतः भारतात विकसित करण्यात आली आहे. येत्या काळात मोबाईलसह ई- वाहनांसाठीही या बॅटरीचा वापर करता येईल. सध्या उपलब्ध बॅटरीपेक्षा ही बॅटरी स्वस्तात मिळेल” असे सी-मेटचे महासंचालक डॉ. भरत काळे यांनी सांगितल्याचे कळते
मोनोरेलची दुरुस्तीही भारतातच…
मुंबईच्या मोनोरेलची दुरुस्तीही भारतातच सुरू आहे. पूर्वी मोनोच्या ताफ्यात १० गाड्या होत्या. त्यापैकी ३ विविध कारणांनी नादुरूस्त झाल्या होत्या. सुरूवातीला मोनोरेलचा ताबा स्कोमी नावाच्या विदेशी कंपनीकडे होता. एमएमआरडीएने स्वतःच्या ताब्यात मोनोरेल घेतल्यानंतर, नादुरूस्त गाड्यांच्या दुरूस्तीसाठी स्वदेशी भाग वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आता स्वदेशी बांधणीची मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.