भारताने आपला प्राचीन वसुधैव कुटुम्बकम् हा बाणा जपत, कोविड-१९ वर परिणामकारक ठरलेली कोविशिल्ड ही लस इतर देशांना पाठवायला सुरूवात केली आहे. भारताने हे पाऊल मैत्रीच्या नात्यातून उचलले आहे. आता सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया सुमारे १०० पेक्षा अधिक देशांना कोविशिल्ड लशीचा पुरवठा करणार आहे.
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुलांसाठीच्या संघटनेत एक करार झाला आहे. या करारानुसार ऍस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड या संस्थांनी तयार केलेली कोविशिल्ड लशीचे १.१ बिलीयन डोस १०० देशांना पुरवणार आहे. जगातील सर्वात मोठा औषध उत्पादक असलेल्या भारताने कोविडने ग्रस्त असलेल्या देशांसाठी लसीचा पुरवठा करायला सुरूवात केली आहे.
भारताने आपल्या लसमैत्रीची सुरूवात शेजारील राष्ट्रांपासून केली होती. या अंतर्गत नेपाळ, भूतान, मालदीव यासारखे भारताचे शेजारी असलेल्या मित्र देशांना भारताने लस पुरवली होती. यापैकी काही देशांना तर लशीची पहिली खेप मोफत पुरवली गेली होती. त्यानंतर भारताने इतर देशांनाही लशीचा पुरवठा करायला सुरूवात केली आहे. यात ब्राझिल, बार्बाडोस यांसारख्या जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या देशांचाही समावेश होतो. ब्राझिल आणि बार्बाडोसच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांचे लसी बद्दल आभार देखील मानले आहेत. या देशांखेरीज, म्यानमार, दक्षिण आफ्रिका, मॉरिशियस इत्यादी देशांनाही भारताची लस पोहोचली आहे.