एमआयएमने महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा प्रस्ताव मांडल्यावर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला असतानाच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. रामदास आठवले यांनी आपल्या शैलीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवले यांनी त्यांच्या शैलीत एक कविता ट्विट केली आहे. “एमआयएमची आहे हार्डलाईन, त्यामुळे सर्वांनी केले आहे त्यांना साईडलाईन.” असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तर “एमआयएमशी कोणी युती करत नसेल तर त्यांनी एकट्याच्या बळावर लढावे,” असा सल्लाही रामदास आठवले यांनी एमआयएमला दिला आहे.
एम आय एम ची आहे हार्डलाईन
त्यामुळे सर्वांनी केले आहे त्यांना साईडलाईन !
एम आय एम शी कोणी युती करीत नसेल तर त्यांनी एकट्याच्या बळावर लढावे.— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 20, 2022
एमआयएम ही महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचा प्रस्ताव औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला होता. “तुमचं तीन चाकाचं सरकार आहे, आम्हला त्यात सामिल करून चारचाकी करा, आम्हाला सोबत घ्या,” असे आवाहन इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांना केले होते.
हे ही वाचा:
‘यांची मिलीजुली कुस्ती सुरू आहे आणि सगळे मिळून खेळत आहेत’
पंतप्रधान मोदींची जपानच्या पंतप्रधानांना ‘कृष्ण पंखी’ भेट
आर आर आर चित्रपटाची टीम पोहोचली स्टॅच्यू ऑफ युनिटीला
अगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
त्यानंतर मात्र, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. महाविकास आघाडीत एमआयएमच्या युतीबाबतच्या प्रस्तावानंतर विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. शिवसेनेवर भाजपा नेत्यांनी टीकास्त्र डागले होते. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एमआयएम सोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. नंतर रविवारी मुख्यमंत्र्यांनीही एमआयएमचा प्रस्ताव नाकारला आहे.