एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात चांगल्याच हालचाली दिसून येत आहेत. एमआयएमच्या प्रस्तावानंतर भाजपचे नेते सातत्याने शिवसेनेवर टीकेची झोड उठवत आहेत. यावरूनच विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, “अजाण स्पर्धा भरवणार ते, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार ते, त्यांचेच घटक पक्ष एमआयएम सोबत युती करायचा विचार करणार आणि आरोप ही हेच करणार. ही मिलिजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळतायेत,” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.
ही त्यांची मिलीजुली कुस्ती आहे,
ते सगळे मिळून खेळताहेत !
पुण्यात माध्यमांशी संवाद… #Pune pic.twitter.com/KWJqaxnr0h— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 20, 2022
देवेंद्र फडणवीस हे आज मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीला गेले होते. त्यांनी या शर्यतीत धावणाऱ्या बैलगाड्यांच्या नंबरचा आधार घेत महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार टोलेबाजी केली. “मी ठरवलं की नंबर एक येतोच, मात्र महाविकास आघाडीचे नेते तीन मार्कशीट जुळवून पहिले आले,” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींची जपानच्या पंतप्रधानांना ‘कृष्ण पंखी’ भेट
आर आर आर चित्रपटाची टीम पोहोचली स्टॅच्यू ऑफ युनिटीला
अगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा
याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमच्या प्रस्तावावरून शिवसेनेवर निशाणा साधला होता. भाजपाला हरवण्यासाठी हे सर्व एकत्र येत आहेत. पण कोणीही एकत्र आले तरी भाजपाला हरवू शकत नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एमआयएमशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.