राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव यांच्यावर नाशिकच्या एका रहिवाशाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वैभव हे राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
राजस्थान पर्यटन विभागात ई-टॉयलेटचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाने फसवणूक केल्याप्रकरणी वैभव गहलोतसह १४ जणांवर १७ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नाशिकच्या सुशील पाटील नावाच्या व्यक्तीने दाखल केला आहे. वैभव गेहलोतचा जवळचा माणूस अशी ओळख सचिन वलेराने पाटील यांना करून दिली. आणि सरकरासोबत करार करून देण्याच्या बहाण्याने सचिन याने पाटील यांच्याकडुन ६.८० कोटी घेतले.
” सचिन याने मला सरकारी करारावर काम करणाऱ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत भागीदार होण्यास सांगितले. त्या कंपनीमार्फत मी ६.८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जेव्हा माझ्या गुंतवणुकीवरील परतावा थांबला तेव्हा मी त्यांना याबाबत विचारले. तेव्हा सचिनने माझी आणि वैभव गेहलोत यांच्यात व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करून दिली. त्यावेळी गेहलोत यांनी मला माझ्या गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. ” असे सुशील पाटील यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘ज्या मलिकांनी शिवसेना भवनात स्फोट घडवला त्यांनाच शिवसेना वाचवतेय’
‘पाकिस्तानी एजन्टसाठी बेस्ट बसेस भंगारात काढल्यात का?’
फुटबॉल सामना चालू असताना गॅलरी कोसळली आणि….
दरम्यान पाटील यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर त्यांच्या सुरक्षेची भीती वाटत असल्याने त्यांनी सरकारी सुरक्षेची मागणी केली आहे. मात्र, वैभव गेहलोत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलावरील आरोपानंतर, राजस्थानचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.