दिल्ली पोलिसांनी कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवायला काय करावे याचे मार्गदर्शन करणाऱ्या टुलकिट बनवणाऱ्याच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. मात्र या एफआयआरमध्ये कोणाचेही नाव घालण्यात आलेले नाही. आता या टुलकिटचा नेमका निर्माता कोण? हे जाणून घेण्यासाठी दिल्ली पोलिस थेट गुगलची मदत घेणार आहेत.
Delhi Police are going to write to Google to get the IP address or the location from where the doc was made and uploaded on social media platform. This is being done to identify the authors of the toolkit which was shared on the Google Doc: Police sources
— ANI (@ANI) February 5, 2021
दिल्ली पोलिसांनी टुलकिटचा निर्माता कोण हे जाणून घेण्यासाठी थेट गुगललाच लिहीण्याचे ठरवले आहे. दिल्ली पोलिसांकडून गुगलला टुलकिट ज्या आयपी पत्त्यावरून तयार करण्यात आला, त्याचा शोध घेण्यासाठी लिहीण्यात येणार आहे. त्याच्या आधारे हे टुलकिट बनवणाऱ्या व्यक्तीची ओळख उघड होऊ शकते.
कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला देशाबाहेरून काही सेलिब्रेटींनी पाठिंबा दर्शवायला सुरूवात केली. यात स्वीडनमधील शाळकरी पर्यावरणप्रेमी ग्रेटा थनबर्गनेही उडी घेतली. मात्र उत्साहाच्या भरात केलेल्या ट्वीटमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला काय करावे याचे मार्गदर्शन करणारे टुलकिट तिने ट्वीट केले, जे थोड्याच वेळात काढून घेतले. त्यानंतर दुसरे ट्वीट करून त्यात नवे टुलकिट देण्यात आले होते आणि आधीचे टुलकिट जुने असल्याचा दावा करणारा शहाजोगपणा ग्रेटाने केला होता. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतरही ग्रेटाने आपण अजूनही शेतकऱ्यांचे समर्थन करत असल्याचे ट्वीट केले आहे.
यानंतर अनेक भारतीय खेळाडू, कलावंत यांनी मोठ्या प्रमाणात ट्वीट करून या परदेशी सेलिब्रेटींना सडेतोड उत्तर दिले आहे.