स्वीडनमधील शाळकरी पर्यावरणप्रेमी मुलगी ग्रेटा थनबर्ग हिने काल भारतातील कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याचा खोडसाळपणा केला. मात्र हा प्रकार चांगलाच अंगलटी आला. ग्रेटा थनबर्ग हिने कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ट्वीट केले. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करताना या ट्वीटसोबत देण्यात आलेल्या टुलकीटवरच एफआयआर दाखल केला आहे. मात्र यात कोणाचेही नाव देण्यात आले नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या ट्वीट सोबत एक पीडीएफ जोडण्यात आले होते. ते पीडीएफ म्हणजेच कथित शेतकरी आंदोलनाला कसा पाठिंबा द्यावा याचे मार्ग सुचवणारे टुलकिट होते. त्या पीडीएफमध्ये २६ तारखेच्या कटाचा आराखडा लिहिलेला होता. केवळ २६ तारखीच नाही तर विविध दिवशी कोणत्या तऱ्हेने आंदोलन करावे याबद्दल देखील सुचना करण्यात आल्या होत्या.
याशिवाय या पीडीएफमध्ये विविध मार्गांनी कथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काय काय करावे त्याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. यात विदेशातील भारतीय सरकारी कार्यालये, दूतावास यांच्यासमोर आंदोलन करण्यास सुचवले होते. याबरोबरच त्यात प्रामुख्याने अदानी आणि अंबानी यांना लक्ष्य करून त्यांच्या कार्यालयांसमोर देखील निदर्शने करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
Here’s an updated toolkit by people on the ground in India if you want to help. (They removed their previous document as it was outdated.)#StandWithFarmers #FarmersProtesthttps://t.co/ZGEcMwHUNL
— Greta Thunberg (@GretaThunberg) February 3, 2021
या टुलकिटमध्ये अनेक विखारी वेबसाईटचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यातील आस्क इंडिया व्हाय या वेबसाईटवर धादांत खोटी माहिती देण्यात आली आहे. याच वेबसाईटवर शीख समुदाय सार्वभौम असल्याचे देखील म्हटले आहे.
हे ट्वीट थोड्याच वेळात ग्रेटाकडून डीलीट करण्यात आले. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या ट्वीट सोबत आधीच्या ट्वीटमधील माहिती जुनी असल्याचे शहाजोगपणे सांगितले. नव्या ट्वीटमध्येही अशाच तऱ्हेचा एक टुलकिट दिलेला आहे.