काँग्रेसचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे रविवारी होत असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राजीनामा देणार असल्याच्या बातमीने खळबळ उडाली. काँग्रेसने मात्र हे वृत्त फेटाळले आहे.
रविवारी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक दुपारी ४ वाजता होणार आहे. त्यात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसला स्वीकाराव्या लागलेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेसचे उपरोक्त तीन प्रमुख नेते राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तशा अर्थाचे वृत्तही अनेक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. एनडीटीव्हीने तसे वृत्त दिले होते पण नंतर ते डीलिट केले आणि काँग्रेसने या वृत्ताचा इन्कार केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. काही वाहिन्यांनी मात्र हे तिघेही राजीनामा देतील हे वृत्त कायम ठेवले आहे.
काँग्रेसचे प्रवक्त रणदीप सूरजेवाला यांनी म्हटले आहे की, सूत्रांच्या आधारे देण्यात आलेल्या राजीनाम्याच्या बातम्या खोट्या आहेत. कोणत्या आधाराशिवाय हे वृत्त देण्यात आले असून ते अनुचित आणि चुकीचे आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर या राज्यांतील निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले आणि त्यात काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसचे हे तीन प्रमुख नेते आपली पदे त्यागतील आणि काँग्रेस कार्यकारिणीला अध्यक्षाची निवड करण्यास सांगतील असे वृत्त होते.
हे ही वाचा:
‘देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची करणार होळी’
ओदिशामध्ये आमदाराच्या गाडीने २२ भाजपा कार्यकर्त्यांना चिरडलं
विद्यार्थ्याच्या फी संदर्भात विचारणा केल्यावर पालकाला मारहाण
मविआ सरकार बॅकफूटवर; फडणवीसांच्या घरी जाऊन नोंदवणार जबाब
या पाच राज्यांतल्या निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली. आम आदमी पार्टीने ९० पेक्षा अधिक जागा जिंकत भगवंत मान यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब केले. मणिपूर, उत्तराखंड येथेही काँग्रेसला हार पत्करावी लागली. गोव्यातही भाजपाने बाजी मारली. उत्तर प्रदेशमध्ये तर प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लढली पण काँग्रेसला अवघ्या २ जागा मिळाल्या. काँग्रेसला अवघ्या २.४ टक्के मते मिळाली.
एकीकडे काँग्रेसमधील बंडखोर २३ नेत्यांनी बैठक घेऊन या पराभवाची कारणमीमांसा केली पण गांधी कुटुंबाशी निष्ठा बाळगणाऱ्यांनी मात्र गांधी कुटुंबियांवर विश्वास दाखविला.