भारतविरोधात जिहाद पुकारण्यासाठी मुस्लिम युवकांची भर्ती करण्याचे कारस्थान आयसीस या दहशतवादी संघटनेकडून करण्यात येत होते, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटले आहे. ‘व्हॉइस ऑफ हिंद’ या आयसीसच्या प्रचारपत्रक प्रकरणात ही संस्था तपास करत असून हे पुरवणी आरोपपत्र आयसीसच्या अफशान परवेझ आणि तौहिद लतिफ सोफी या दोन दहशतवाद्यांविरोधात दाखल करण्यात आले आहे.
दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी त्यांना आर्थिक पुरवठा करणे आणि सोशल मीडियावर हा कट आखण्यासाठी मोहीम राबवणे असे आरोप या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहेत.
हे दोन्ही तरुण श्रीनगरमधील असून त्यांच्याविरोधात हे पुरवणी आरोपपत्र दिल्लीत विशेष न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या दोन तरुणांपैकी परवेझ हा आयसीसचा प्रमुख कार्यकर्ता होता आणि या आरोपपत्रात असलेला आणखी एक आरोपी उमर निसार याचा साथीदार होता.
हे ही वाचा:
विद्यार्थ्याच्या फी संदर्भात विचारणा केल्यावर पालकाला मारहाण
ओदिशामध्ये आमदाराच्या गाडीने २२ भाजपा कार्यकर्त्यांना चिरडलं
भाजपा सरकारच्या आणखी एका निर्णयाला मविआकडून स्थगिती
वेस्ट इंडीजवर भारतीय महिला संघाचा १५५ धावांनी दणदणीत विजय
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात स्थित आयसीसशीही त्याचा संबंध होता. उमर निसारच्या अटकेनंतर भारतातील दहशतवादी कारवायांसाठी परवेझला नियुक्त करण्यात आले होते. त्याच्याकडे प्रचार आणि प्रसारासची जबाबदारी होती. तसेच प्रत्यक्ष भारतातील कारवायांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही होती. आयसीसकडून प्रचार करण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी विविध सोशल मीडिया माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम तो करत असे.
आयसीसच्या प्रचारपत्रकाचे पोस्टर्स बनवणे आणि त्याचे संपादन करण्याची जबाबदारी सोफीकडे होती, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हटले आहे. यावर्षी ६ जानेवारीला आयसीसच्या चार दहशतवाद्यांविरोधात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे.