जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. हो अशा शुभेच्छा आज जगभर सगळीकडे दिल्या जात आहेत. त्यामुळे त्यात वेगळे असे काही नाही. पण याच शुभेच्छा ८ मार्चला चक्क अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारने दिल्या आहेत. तालिबानने दिलेल्या शुभेच्छांबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तालिबानचे सरकार अफगाणिस्तानमध्ये आल्यानंतर महिलांवरील निर्बंधांत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या या महिला दिनाच्या शुभेच्छांमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल कहार बाल्खी यांनी ८ मार्चला सकाळी ट्विट केले आणि महिलांना हा दिवस आनंदाचा जावो अशा शुभेच्छा दिल्या.
हे ही वाचा:
RTO मधील ‘सचिन वाझे’ असलेल्या बजरंग खरमाटेच्या घरी आयकर विभागाची धाड
कोण आहे हा बजरंग खरमाटे? आमदार भातखळकरांनी विचारला सवाल
युक्रेनसाठी धावून आला अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो
अनिल परबांच्या सीएच्या घरीही आयकर विभागाचे छापे
तालिबानने १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानची सत्ता सांभाळली तेव्हा महिलांच्या सर्व अधिकार व हक्कांचे उल्लंघन केले गेले. जेव्हा गेल्यावर्षी त्यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली तेव्हा महिलांच्या अधिकार व हक्कांविषयी बोलणाऱ्या संघटनांमध्ये संभ्रम होता. जरी तालिबान सरकारने महिलांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे संकेत दिले असले तरी त्याविषयी सर्वांनाच साशंकता होती. शेवटी तालिबानचे सरकार आले आणि महिलांचा संशय खरा ठरला. त्यांनी मुलींच्या सर्व माध्यमिक शाळा बंद केल्या आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांना निर्बंध घातले आहेत. संगीत, स्थानिक रेडिओ स्टेशनवरील महिलांच्या नोकऱ्यांवर त्यांनी गदा आणली आहे. महिला कल्याण खातेच बंद करण्यात आले आहे. १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना लैंगिक शोषणासाठी लक्ष्य करण्याचा घृणास्पद प्रकारही या राजवटीत सुरू झाला आहे. आता हेच तालिबानी सरकार महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहे, हे पाहून सर्वांनाच त्याचे आश्चर्य वाटत आहे.