एक्झिट पोलमध्ये भाजपाला उत्तर प्रदेश, मणिपूरमध्ये दमदार विजय
देशातील ज्या पाच राज्यांच्या निवडणुकांकडे सगळ्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातील उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर सायंकाळी एक्झिट पोल जाहीर झाले आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचेच सरकार कायम राहणार यावर सगळ्यांनीच शिक्कामोर्तब केले. उत्तर प्रदेशची निवडणूक ही देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक मानली जाते. त्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा मान योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला मिळणार असेच संकेत सगळ्या एक्झिट पोल कंपन्यांनी दिले आहेत. योगी यांचे सरकार बहुमताचा आकडा तर पार करेलच पण ३००च्या जवळपास पोहोचेल असा अंदाज इंडिया टुडेने व्यक्त केला आहे.
‘इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया’ने भाजपाला उत्तर प्रदेशात २८८ ते ३२६ जागा दाखविल्या आहेत तर काँग्रेसला अवघ्या १ ते ४. प्रतिस्पर्धी सपाला ७१ ते १०१ जागा दाखविण्यात आल्या आहेत. इतर कंपन्यांच्या तुलनेत इंडिया टुडेने सर्वाधिक कमी जागा सपाला दिल्या आहेत.
रिपब्लिक टीव्ही ‘पी मार्क’ने उत्तर प्रदेशमधील ४०३ जागांपैकी २४० जागा भाजपाला मिळतील असा दावा केला असून भाजपाचा उत्तर प्रदेशमधील मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या समाजवादी पार्टीला १४० जागा मिळण्याचे संकेत दिले आहेत. बसपाला १७ जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर काँग्रेसला अवघ्या ४ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ‘जन की बात’ने केलेल्या सर्वेक्षणात भाजपालाच झुकते माप देण्यात आले आहे. त्यात २२२ ते २६० या दरम्यान जागा मिळतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. त्या तुलनेत समाजवादी पक्षाला १३५ ते १६५च्या दरम्यान जागांची शक्यता दाखविण्यात आली आहे. काँग्रेसला मात्र १ ते ३ जागाच मिळण्याची शक्यता आहे. ‘मॅट्रिझ’ने तर भाजपाला उत्तर प्रदेशात २६२ ते २७७च्या दरम्यान जागा दिल्या आहेत. तिथे समाजवादी पक्षाला मात्र खूप मागे टाकले आहे. त्यांनी ११९ ते १३४ जागा मिळतील अशी शक्यता आहे. काँग्रेसला ३ ते ८ आणि बसपाला ७ ते १५ जागा दाखविल्या आहेत.
टाइम्स नाऊ व्हेटोने उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला २२५ जागा तर सपाला १५१ जागा दाखविल्या आहेत. ‘न्यूज एक्स पोलस्ट्रॅट’ने उत्तर प्रदेशात भाजपाला २११ ते २२५ तर सपाला १४६ ते १६० अशा जागांची शक्यता वर्तविली आहे. बसपाला १४-२४ जागा मिळतील असाही दावा केला आहे.
मणिपूरमध्ये भाजपाची सरशी
मणिपूरमध्येही भाजपाचाच बोलबाला आहे तर उत्तराखंड व गोव्यात सत्तेसाठी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात टक्कर असेल. मणिपूरमध्ये ‘जन की बात’नुसार भाजपाला ६० जागांपैकी २३ ते २८ जागा मिळतील तर काँग्रेसला १०-१४ जागांची अपेक्षा आहे. ‘पी मार्क’ने मणिपूरमध्ये भाजपाला ३१ जागा दिल्या आहेत तर काँग्रेसला १७.
पंजाबमध्ये ‘आप’ची शंभरी
पंजाबमध्ये मात्र आम आदमी पार्टीचा बोलबाला सांगितला जात आहे. तिथे एकूण जागा ११७ आहेत. ‘चाणक्य’ने तर आप पार्टीला १०० जागांचे दणदणीत यश दाखविले आहे. मात्र काँग्रेसला सुपडा तिथे साफ होण्याची चिन्हेही असल्याचे त्यांचे मत आहे. काँग्रेसला अवघ्या १० जागा मिळतील. पोल ऑफ पोल्सने म्हटले आहे की, पंजाबमध्ये आम आदमीला ६६ जागा मिळतील तर पोलस्ट्रॅटने ५६-६१ जागांची ग्वाही दिली आहे. काँग्रेसला त्यांनी २४-२९ जागा दाखविल्या आहेत. टाइम्स नाऊने पंजाबमध्ये आम आदमीला ७० जागा मिळतील असे म्हटले आहे.
हे ही वाचा:
तब्बल ३८ वर्षांनंतर प्रशासकाकडे मुंबई महापालिकेचा पदभार
स्थायी समितीत कोणत्याही चर्चेविना ६ हजार कोटींचे ३७० प्रस्ताव मंजूर; भाजपाचे आंदोलन
अभिनेते नसीरुद्दीन शाह ‘या’ गंभीर आजारामुळे त्रस्त
जागतिक महिला दिनी महिला पोलीस अंमलदारांना मिळाली मोठी ‘भेट’
गोव्यात भाजपा-काँग्रेस टक्कर
गोव्यात इंडिया टुडेने भाजपा आणि काँग्रेस यांच्यात टक्कर दाखविली आहे. भाजपाला १४ ते १८ जागा तर काँग्रेसला १५ ते २० जागा दाखविण्यात आल्या आहेत. रिपब्लिक पी मार्कने भाजपाला १३ ते १७ आणि काँग्रेसलाही तेवढ्याच जागा दाखविल्या आहेत. आम आदमी पार्टी तिथे २ ते ६ जागा जिंकू शकेल असेही संकेत दिले आहेत. झी न्यूजने गोव्यात भाजपाला १५ तर काँग्रेसला १६ जागा दिल्या आहेत. एकूणच गोव्यात तुल्यबळ लढत पाहायला मिळेल.
उत्तराखंडमध्ये भाजपापुढे काँग्रेसचे आव्हान
उत्तराखंडमध्ये एबीपी सीव्होटरने काँग्रेसला झुकते माप दिले आहे. तिथे काँग्रेस ३२ ते ३८ तर भाजपा २६ ते ३२ जागा घेऊ शकेल. आप पक्ष तिथे २ जागा जिंकू शकतो. इंडिया टुडेच्या मते भाजपा उत्तराखंडमध्ये बाजी मारेल. त्यांच्या मते ३६ ते ४६ जागी भाजपाचा विजय होईल. तर काँग्रेसच्या खात्यात २० ते ३० जागा असतील. चाणक्यच्या मते भाजपाला ४३ तर काँग्रेसला २४ जागा मिळतील.