अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर रवी राणांवर ३०७ आणि ३५३ चा गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण विधानसभेत तापले असून आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवरच आरोप केले आहेत. घटनास्थळी नसताना आणि दिल्लीत असताना माझ्यावर गुन्हा दाखल करत असाल तर मी विधानसभेतच फाशी घेईन, असा इशारा रवी राणा यांनी दिला.
“मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फोन केल्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी खोटं बोलत असेल तर माझ्याकडे पेन ड्राईव्ह असून त्यात सर्व पुरावे आहेत,” असा खळबळजनक दावा राणा यांनी केला. दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री किंवा आपण कुणालाही फोन केला नसल्याचे सांगितले आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
“आज मला आर आर पाटलांची आठवण येते. त्यांच्या सारखा गृहमंत्री या राज्याला पाहिजे. तुम्ही वाझे सारखे गुन्हेगारी अधिकारी निर्माण कराल तर तुमची अवस्था अनिल देशमुखांसारखी होईल,” असे रवी राणा म्हणाले. “या माझ्या भावना नसून संपूर्ण समाजाच्या भावना आहेत. गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही फोन करता हे महाराष्ट्राचे दुर्देव. माझ्याविरोधात रात्री साडे दहा वाजता हा गुन्हा दाखल केला,” अशी टीका रवी राणा यांनी केली. “एवढं प्रेशर आहे की, रवी राणा दिसला तर गोळी मारा असे सांगितल्या गेल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितलं. अशा प्रकारची परिस्थिती असेल आणि मी खोटं बोलत असेल तर पेनड्राईव्हमध्ये पुरावे आहेत. मी फाशी घेईल. मला फाशी द्या,” असं खळबळजनक वक्तव्य रवी राणा यांनी केले.
“राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी शिवभक्तांनी पुतळा बसवला. पण पाच दिवसानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी छन्नी हातोड्याने पुतळा हटवला. त्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. ९ तारखेला शिवभक्तांनी शाई फेकली. त्यांच्या कृत्याचे समर्थन करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या दिवशी रेल्वेच्या मिटिंगसाठी आपण दिल्लीत असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा गुन्हा दाखल झाला आणि माहिती घेतली तेव्हा पोलीस आयुक्त आरपी सिंग यांनी सांगितलं की, सरकारमधील काही लोकांनी मला हा गुन्हा दाखल करायला लावला. रवी राणांना अटक करण्यास सांगितलं,” असा गौप्यस्फोट रवी राणा यांनी केला.
हे ही वाचा:
… म्हणून भारतीय महिलांचं होतंय कौतुक!
‘नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार आहात?’
४३४; फिरकीपटू अश्विनकडून कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी
युक्रेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना का घातले साकडे?
“त्यानंतर १०० ते १५० पोलीस घरी पोहचले. आई वडिलांना नीट चालता येत नाही. तरीही त्यांना ३ वाजता उठवून घराची झडती घेण्यात आली. खासदार नवनीत राणा यांना ताब्यात घेतलं. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सीपीला फोन करून मला अटक करण्यास सांगितलं. माझ्याकडे पुरावा आहे. पेन ड्राईव्हमध्ये पुरावा आहे,” असा दावाही त्यांनी केला.