शेतकरी प्रश्नांवरून विरोधक ठाकरे सरकारला कोंडीत पकडत असतानाच मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक झाली आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी १५ फेब्रुवारीपासून महावितरण कार्यालया समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र, ठाकरे सरकार यावर कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
राजू शेट्टी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “तेलंगणा शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज देते. कर्नाटक दिवसा सात तास मोफत वीज देते. राजस्थानने शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला आहे, मग कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला काय लकवा मारलाय काय?” असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
तेलंगणा शेतकर्यांना २४ तास मोफत वीज देते, कर्नाटक दिवसा ७ तास मोफत वीज देते, राजस्थानने शेतकर्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. मग कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला काय लकवा मारलाय काय?#शेतीलादिवसा१०तासवीजद्या@ANI @CMOMaharashtra @NitinRaut_INC
— Raju Shetti (@rajushetti) March 6, 2022
हे ही वाचा:
… म्हणून भारतीय महिलांचं होतंय कौतुक!
‘नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार आहात?’
को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी एनएसईच्या चित्रा रामकृष्ण यांना अटक
मुंबईत गाड्या ‘टो’ न करण्याचा प्रयोग
विरोधी पक्षाकडूनही महाविकास आघाडी सरकारवर शेतकऱ्यांच्या समस्यांवरून टीका केली जाते. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली जातात, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून भाजपा ठाकरे सरकारवर निशाणा साधत असते. दरम्यान, दहा दिवस वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राज्यसरकारला जाग यावी यासाठी राजू शेट्टी यांनी या काळात राज्यभर रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेधही केला आहे. दोन दिवसांपूर्वीच पंढरपूर तालुक्यातील मगरवाडीच्या सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचा व्हिडीओ भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेअर करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.