पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ६ मार्च रोजी पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यात नरेंद्र मोदी यांचा पुणे महापालिकेकडून विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला आहे.
पुण्यात नरेंद्र मोदी यांचे खास स्वागत व्हावे यासाठी पंतप्रधान मोदी यांना खास पुणेरी पगडी देऊन पाहुणचाराने सन्मानित करण्यात येणार आहे. या खास फेट्याची निर्मिती मुरुडकर झेंडेवाले यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला सोबत घेऊन देशाचा विकास करत आहेत. त्यांना आपला देश महासत्ता बनवण्यासाठी अजून ताकद मिळावी या विचाराने पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आकर्षक राजबिंडा शाही फेटा तयार केला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ऐतिहासिक फेट्याची मागणी केली होती. नरेंद्र मोदी पुण्यात आल्यावर पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यावरून या फेट्याची कल्पना सुचल्याचे गिरीश मुरुडकर यांनी सांगितले. नरेंद्र मोदी हे शक्यतो क्रीम कलरचे कपडे परिधान करतात आणि लाल रंग हा ऐतिहासिक आहे. याचा विचार करून या दोन रंगांमध्ये फेटा तयार केल्याचे त्यांनी सांगितले. फेट्यावर सूर्यफूल बसवण्यात आले असून त्यावर राजमुद्रा बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फेट्याला ऑस्ट्रेलियन डायमंड बसवण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांना गरम होऊ नये म्हणून फेट्याच्या पृष्ठभागावर जाळी बसवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
चार राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार
मणिपूरमध्ये नेत्याच्या घरावर बॉम्ब हल्ला
युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या या अटी
…आणि लिबियातून भारतीयांची जलदगतीने सुटका केल्याच्या बतावणीत काँग्रेस मग्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी पुणे येथील विमानतळावर पोहचतील. तिथून ते पुणे महानगरपालिकेत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर ११.३० वाजता पुणे मेट्रोचे उद्घाटन करून ते गरवारे स्थानकापासून मेट्रोने प्रवास करणार आहेत. एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचे उद्घाटन झाल्यानंतर तिथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. सभा संपल्यानंतर आर के लक्ष्मण गॅलरीचे उद्घाटन करतील. त्यानंतर तीन वाजता ते पुण्यातून रवाना होतील.