युक्रेनवरील हल्ले थांबवायचे असल्यास युक्रेनला रशियाने मांडलेले मुद्दे, धोरणे स्वीकारावे लागतील, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धाच्या नवव्या दिवशी असे सांगितले आहे. जर्मन चॅन्सेलरशी झालेल्या चर्चेत पुतिन यांनी युक्रेनियन शहरांवर बॉम्बफेक केल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे.
रशियाच्या अध्यक्षीय कार्यालयाने म्हटले की, युक्रेनमधील शहरांवर बॉम्बहल्ला झाल्याचे वृत्त खोटे आहे. जर्मनीचे चांसलर ओलाफ सोल्झ यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पुतिन यांनी हे स्पष्ट केले आहे. युक्रेनची राजधानी कीव आणि इतर प्रमुख शहरांमध्ये हवाई हल्ल्यांच्या बातम्या हा अपप्रचार असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तरच युक्रेनबाबत चर्चा शक्य असल्याचे पुतीन यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेन आणि इतर सर्वांशी चर्चेचा पर्याय रशियासाठी खुला असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. परंतु, रशियाच्या सर्व मागण्या मान्य केल्या जाव्यात या अटीवरच ते शक्य असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
…आणि लिबियातून भारतीयांची जलदगतीने सुटका केल्याच्या बतावणीत काँग्रेस मग्न
‘शिवसेनेच्या या दंडेलीला मी घाबरणार नाही’
हिंदू मतांवर डोळा ठेवून काँग्रेस, सपा नेते काशी विश्वनाथ मंदिरात
फिरकीचा जादुगार शेन वॉर्न यांचे निधन; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का
रशियाने युक्रेनसमोर ठेवलेल्या अटी-
- युक्रेन एक तटस्थ आणि अण्वस्त्रविरहित राज्य असेल
- क्राइमियाला रशियाचा भाग मानणे
- पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी प्रदेशांचे सार्वभौमत्व
आता युक्रेन सरकार यावर सकारात्मक पावले उचलेल जेणेकरून संवादाचे सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चेचा पुढील टप्पा आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत, तरीही या चर्चेतून कोणताही ठोस उपाय अद्याप निघालेला नाही.