अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आलेल्या तालिबान सरकारने भारताचे कौतुक केले आहे तर पाकिस्तानवर मात्र नाराजी व्यक्त केली आहे. तालिबानच्या अधिकाऱ्यांनीच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे.
पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये पाठवलेला गहू हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचे सांगत तालिबानने नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतच भारताने पाठवलेला गहू मात्र चांगल्या दर्जाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारताने पाठवलेला २ हजार मेट्रिक टन गहू चांगल्या दर्जाचा आहे, असे कौतुक तालिबानने केले आहे. अत्यंत निकृष्ट गहू पाठवल्याबद्दल तालिबानने पाकिस्तानबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर गव्हाचा करार करून परतले आहेत.
हे ही वाचा:
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघातकी स्फोटात ५६ ठार
राज्यपालांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना सुनावले
पहिल्या दिवसाअखेर भारताने चढवल्या ३५७ धावा
गेल्या महिन्यात भारताने अफगाण लोकांना मानवतावादी मदत म्हणून गहू पाठवण्यास सुरुवात केली. २ हजार मेट्रिक टन गहू घेऊन भारताच्या मानवतावादी मदतीचा दुसरा काफिला गुरुवारी अटारी, अमृतसर येथून जलालाबाद, अफगाणिस्तानसाठी रवाना झाला, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. अफगाण लोकांसाठी ५० हजार मेट्रिक टन गहू देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा हा एक भाग असून संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाद्वारे त्याचे वितरण केले जाईल.