रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिकच चिघळताना दिसत आहे. सात दिवस उलटून गेले तरी हे युद्ध क्षमण्याचे नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे जगभरातून रशियाची कोंडी केली जात आहे. रशियावर जगातून वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध घातले जात आहेत. तर अनेक ठिकाणी रशियाला मज्जाव केला जात आहे. या मध्ये क्रीडा क्षेत्रातून खूप मोठ्या प्रमाणावर रशियाची कोंडी होताना दिसत आहे.
सुरुवातील फुटबॉल आणि आईस हॉकी या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने रशियावर बंदी घातल्याचे समोर आले होते. तर आता त्यात इतरही खेळांचा समावेश होताना दिसत आहे. रशियामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या आईस स्केटिंग या खेळामध्ये रशियावर बंदी घातली गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्केटिंग महासंघाने हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
विराटचा शंभरावा कसोटी सामना प्रेक्षकांच्या साक्षीने
‘मविआ सरकार राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार’
आयएनएस विशाखापट्टणम पीएफआरमध्ये प्रथमच सहभागी
युक्रेनमध्ये व्होडाफोनसह अनेक टेलिकॉम कंपन्या देणार फ्री कॉलींग
तर या सोबतच व्हॉलीबॉल संघटनेनेही रशिया विरुद्ध कारवाई केली आहे. ऑगस्ट महिन्यात होऊ घातलेल्या व्हॉलीबॉल विश्वचषकातून रशिया पुरुष संघाला बाहेर काढण्यात आले आहे. तर २०२३ मध्ये होणाऱ्या रग्बी विश्वचषकातूनही रशियाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यासोबतच जागतिक बॅडमिंटन महासंघानेही रशियावर कारवाई केली आहे. रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर या दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत.
या व्यतिरिक्त रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यावर वैयक्तिक पातळीवरही कारवाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युडो संघटनेने पुतीन यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडे असलेले अध्यक्षपद काढून घेतले आहे. तर तायक्वांडो संघटनेने पुतीन यांच्याकडे असलेला ब्लॅक बेल्ट काढून घेतला आहे. पण असे असले तरी देखील रशिया युद्धातून मागे हटायला तयार नाही.