भारतात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये ५ व्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. सकाळपासूनच या मतदानाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असून नागरिक मतदान केंद्रांवर रांग लावून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.
उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील १२ जिल्ह्यातील ६१ विधानसभा क्षेत्रात हे मतदान पार पडत आहे. निवडणूकीच्या या पाचव्या टप्प्यात अयोध्या आणि प्रयागराज सारख्या महत्वाच्या भागांमध्ये मतदान पार पडत आहे. तर या सोबतच एकेकाळी काँग्रेस पक्षाचा गड मानला जाणाऱ्या रायबरेली आणि अमेठीमध्ये लोक मतदान करून आपला कौल देणार आहेत. यावेळी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला धक्का लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या व्यतिरिक्त सुलतानपुर, चित्रकूट, प्रतापगड, कौशंबी, प्रयागराज, बाराबंकी, बहराईच, श्रवस्ती आणि गोंडा या ठिकाणी मतदान पार पडणार आहे.
हे ही वाचा:
‘ठाकरे सरकारची मोड्स ऑपरेंडी ठरलेली आहे’
भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक
एल्फिन्स्टनचा उड्डाणपूल मराठी माणूस होणार का गुल?
निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार मतदानाच्या या पाचव्या टप्प्यात २ कोटी २४ लाख ७७ हजार ४९४ मतदार आहेत. तर ६१ मतदारसंघांमध्ये मिळून ६९३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान चालेल. सकाळी ११ वाजेपर्यंत २१ टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. कोविड प्रतिबंधक सर्व नियमावलीचे पालन करूनच हे मतदान पार पडत आहे.