विरोधी पक्षातील नेते सुडाच राजकारण करत केंद्रीय यंत्रणांचा वापर सत्ताधारी नेत्यांवर करत असल्याचा आरोप करणाऱ्या ठाकरे सरकारने पुन्हा एकदा त्यांच्याच सूडबुद्धीचे दर्शन दिले आहे. सरकारमधील काही नेत्यांवर ईडी कारवाई, आयकर विभाग कारवाई करण्यात आल्यानंतर बिथरलेल्या ठाकरे सरकारने सूडबुद्धीने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दिशा सालियन हिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गौप्यस्फोट नारायण राणे आणि नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर दिशा सालियन हिच्या आई आणि वडिलांची भेट घेऊन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणाला अजून हवा दिली होती. त्यानंतर दिशा हिच्या पालकांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती.
मात्र, नारायण राणे आणि नितेश राणे यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ठाकरे सरकारच्या सुडाच्या राजकारणाचे दर्शन झाल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर घाणाघाती टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांचे पुन्हा ‘सूड दुर्गे सूड’ दिशा सालियन प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात एफआयआर. खुनशी ठाकरे सरकारचा निषेध,’ असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांचे पुन्हा 'सूड दुर्गे सूड'…
दिशा सालीयन प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल केंद्रीय मंत्री @MeNarayanRane आणि आमदार @NiteshNRane यांच्याविरोधात FIR. खुनशी ठाकरे सरकारचा निषेध…— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 27, 2022
हे ही वाचा:
फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिकाही खिशात
‘ऑपरेशन गंगा’चे दुसरे विमान भारतीयांना घेऊन दिल्लीत दाखल
उत्तर प्रदेशमधून ओवैसींचा अजित पवारांवर निशाणा
पंतप्रधान मोदींकडे युक्रेनचे मदतीसाठी साकडे
नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला असून त्यात दिशाच्या पोस्टमार्टम अहवालामध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याची नोंद आहे. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.