“काँग्रेस पक्षाला केवळ बांग्लादेशमध्येच बहुमत मिळू शकते.” असे विधान आसाम सरकारचे मंत्री आणि पूर्वोत्तर भारतातले भाजपाचे महत्वाचे नेते हिमांता बिस्वा सर्मा यांनी केले आहे. आसाम मध्ये एप्रिल-मे २०२१ मध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत.
काँग्रेसचे आसामचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा यांनी, “भाजपाला आसाममध्ये पराभवाचा सामना करावा लागेल. काँग्रेसच्या त्सुनामीमध्ये भाजप वाहून जाईल.” असे विधान केले होते. याला प्रत्युत्तर देताना हिमांता बिस्वा सर्मा म्हणाले की, “त्सुनामी ही केवळ समुद्रातच येते. त्यामुळे काँग्रेसची त्सुनामी ही केवळ बांग्लादेशमध्येच येऊ शकते. आसाम सारख्या ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात असलेल्या राज्यात काँग्रेस ‘त्सुनामी’ आणू शकणार नाही.”
२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आसामच्या १२६ पैकी ६० जागांवर भाजपाला विजय मिळाला होता. तर काँग्रेस पक्षाला केवळ २६ जागा जिंकता आल्या होत्या. आसाममध्ये बहुमतासाठी ६४ जागा जिंकणे आवश्यक असते. तो आकडा भाजपाने आपल्या मित्र पक्षांबरोबर सहज मिळवला आणि एनडीएचा आकडा ८४ पर्यंत गेला. २०१९ च्या निवडणुकीतही आसामच्या चौदा जागांपैकी भाजपाला नऊ तर काँग्रेस पक्षाला तीन जागा मिळाल्या.
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि बद्रुद्दीन अजमल यांचा एआययूडीएफ हा पक्ष युती करतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.