राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी म्हटले की, शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा का होत नाही? याचा शिवसेनेने विचार करावा.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी काही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये फूट पाडत नाही. या पक्षांचे नेते हुशार आहेत. संजय राठोड यांच्यावेळी भाजपने जरा आंदोलन केलं तर राठोड यांचा राजीनामा घेतला. अनिल देशमुखांची चौकशी सुरू होताच त्यांचा राजीनामा घेतला. मग नवाब मलिक यांचा राजीनामा का घेतला नाही? शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा का होत नाही? याचा शिवसेनेने विचार करावा, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
१९९३ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काय भाषणे केली ती सर्वांना माहीत आहे. येत्या काळात आम्ही ही भाषणं ऐकवणार आहोत. शिवसेनेने नेहमीच हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. आताही शिवसेना हीच भूमिका घेणार का हा प्रश्न आहे? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
महाविकास आघाडीत असेपर्यंत शिवसेनेचं मतपरिवर्तन होऊ शकत नाही. एकमेकांच्या निष्ठा दुखवायच्या नाहीत हे त्यांनी ठरवलं आहे. त्यामुळे टिपू सुलतानची जयंती साजरी केलेली चालते त्यांना, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे यांचे आझाद मैदानात उपोषण
युक्रेन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत तटस्थ
पाकिस्तान लष्करात दोन हिंदू अधिकारी
येत्या ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या लोकार्पणाला येणार आहेत. यावेळी ते मेट्रोतून प्रवासही करणार आहेत. त्यामुळे त्या स्टेशनला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.