राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बुधवार, २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. तब्बल साडे आठ तासांच्या चौकशी नंतर मलिक यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. नवाब मलिक यांची वैद्यकीय चाचणी करण्यात अली असून त्यांना विशेष न्यायालयासमोर हजार करण्यात आले आहे.
नवाब मलिक यांच्या अटकेच्या आदेशात ते दोषी आढळल्याचे म्हटले आहे. न्यूज डंकाच्या हाती हा आदेश लागला आहे.ईडीचे सहाय्यक संचालक असलेल्या नीरज कुमार यांनी नवाब मलिक यांना अटक केली आहे. या आदेशात नीरज कुमार असे सांगतात की,
“मी नीरज कुमार, सहाय्यक आयुक्त, सक्तवसुली संचालनालय, झोन १, मुंबई. मला या गोष्टीची खात्री पटली आहे की मोहम्मद नवाब मोहम्मद इस्लाम मलिक, वय वर्ष ६२, राहणार २१८/सी-२ नूर मंझील, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला (प), मुंबई- ४०००७०, हे दोषी असून हा गुन्हा प्रेव्हेंशन ऑफ मनी लॉण्डरिंग कायद्याच्या अंतर्गत शिक्षेस पात्र आहे. म्हणून मी मोहम्मद नवाब मोहम्मद इस्लाम मलिक यांना २३-०२-२०२२ रोजी दुपारी १४.४५ (२.४५) वाजता अटक केली असून त्यांना अटकेचे कारण सांगण्यात आले आहे.”
हे ही वाचा:
ईडी कार्यालयातून बाहेर येताना नवाब मलिक आनंदी का होते?
तामिळनाडू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी
‘अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परबांचा’
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची शक्यता; राष्ट्रवादीची होणार बैठक
दरम्यान नवाब मलिक यांच्या अटके नंतर आता मलिक हे आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीचे सर्व नेते व मंत्री हळूहळू दाखल होत आहेत. तिथे यापुढील घडामोडी घडतील. नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे मंत्रिपद कुणाला देण्यात येणार हे लवकरच स्पष्ट होईल.