अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. या ईडीच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांवर आणि भाजपवर टीका करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारमधील नेते करत आहेत. यावरून आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
तपास यंत्रणा कारवाई करत असताना थयथायाट तीच लोक करतात जे उत्तर देऊ शकत नाहीत, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते उत्तरे देण्यासाठी असमर्थ आहेत, असे आशिष शेलार म्हणाले. गेले अनेक दिवस दाऊद संबंधित लोकांवर ईडीची कारवाई सुरू आहे. मग पुढे दाऊदचे हस्तक कोण याची चौकशी व्हायला नको का? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. तपास यंत्रणांना तेवढही स्वातंत्र्य नाही का? तपास यंत्रणांनी गप्प बसून राहावं ही राष्ट्रवादीची भूमिका आहे का? असे सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.
हे ही वाचा:
‘नवाब मलिक हे आता मंत्रिमंडळात राहू शकत नाहीत’
शरद पवारांची उडी अजूनही जात, धर्मापलीकडे जात नाही
मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याचे नाव दाऊद सोबत जोडले जाते
‘दाऊद सबंधितांशी नवाब मलिकांचे व्यावसायिक संबंध’
आज या प्रकरणावर पत्रकार परिषद घेण्याची काहीही गरज नव्हती मात्र, यांना उत्तरे देता आली नाही की भाजपवर आरोप करायचे, असा टोला आशिष शेलार यांनी सरकारला लगावला आहे. देशहिताच्या विषयात राजकारण करायची गरज काय आहे? नवाब मलिक यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्याच काम संजय राऊत का करत आहेत? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. आतंकवादाला जात, धर्म नसते त्यामुळे शरद पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचे असल्याचे आशिष शेलार म्हणाले. मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याचे नाव दाऊद सोबत जोडले जाते, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. मात्र, अशी भाषा एखाद्या जेष्ठ नेत्याकडून येणे बरोबर नाही असे आशिष शेलार म्हणाले.