धरणं आणि तलाव यांच्यामार्फत आपल्या भविष्यातील पाण्याच्या गरजा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा असते. मात्र, अभ्यासातून असे लक्षात येत आहे, की ते आपल्या जल संरक्षिततेला नुकसान पोहोचवू शकतात. कसे?
भारतातील अनेक धरणे आता जुनी झाली आहेत हे काही लपून राहिले नाही. त्यामुळे त्यांच्यात पाण्याऐवजी मातीच भरली जात आहे, ज्याला शास्त्रीय भाषेत गाळ आणि वाळू म्हणतात.
निरुपयोगीतेकडे वाटचाल
मोठ्या धरणांच्या बांधणीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. एकूण ५ हजार २०० धरणांपैकी १ हजार १०० धरणांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे, आणि त्यापैकी काही तर १२० वर्ष जुने आहेत. २०५० पर्यंत ही संख्या वाढून ४ हजार ४०० पर्यंत जाईल. याचा अर्थ देशाच्या एकूण मोठ्या धरणांपैकी ८० टक्के धरणं ५० ते १५० वर्षं जुनी असणार आहेत.
लघु आणि मध्यम धरणांची अवस्था यापेक्षा गंभीर आहे. कारण त्यांचे मुळातले आयुष्य मोठ्या धरणांपेक्षा कमी असते. कृष्ण राज सागर धरण १९३१ मध्ये बांधले गेले होते आता ते ९० वर्ष जुने झाले आहे. त्याचप्रमाणे मेट्टूर धरण देखील १९३४ मध्ये बांधले होते जे आता ८७ वर्ष जुने आहे. ही दोन्ही धरणं पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कावेरी नदीवर बांधलेली आहेत.
धरणांचे वय होत जाते तसा तसा त्यात गाळ जमा होत जातो. त्यामुळे धरणाची साठवणक्षमता कमी होत जाते. त्यामुळे ती १९०० किंवा १९५० मध्ये जेवढी असेल तेवढी आता राहत नाही.
हे कमी म्हणून की काय, आपल्या अनेक तलावांचे प्रारुप चुकीचे आहे. इकॉनॉमिक ऍंड पॉलिटिकल वीकलीच्या २००३ च्या एका अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘सप्लाय साईड हायड्रॉलॉजी: लास्ट गास्प’ या लेखात लेखक रोहन डिसूझा यांनी सांगितले की, भारताच्या प्रसिद्ध भाक्रा- नांगल या धरणातील गाळ जमा होण्याचा वेग मूळ गृहीत वेगापेक्षा १३९.८६ टक्क्यांनी अधिक आहे. ते पुढे लिहीतात की या वेगाने भाक्रा धरण जास्तीत जास्त ४७ वर्ष उपयुक्त राहील. मूळ धरणाच्या ८८ वर्षांच्या कार्यकाळाच्या हा निम्माच काळ आहे. त्याचप्रमाणे इतर धरणातील गाळ जमा होण्याचा वेग खूप जास्त आहे. हिराकूड, मैथन आणि घोड धरणातील गाळ जमा होण्याचा वेग प्रस्तावित वेगापेक्षा अनुक्रमे १४१.६७ टक्के, ८०८.६४ टक्के आणि ४२६.५९टक्के जास्त आहे. नंतरच्या काळात केलेल्या अभ्यासातूनही हाच निष्कर्ष समोर आला आहे.
अनेक तज्ज्ञांच्या तलावांच्या अभ्यासातून असे लक्षात आले आहे की भारतातील तलावांच्या प्रारूपात गाळ जमा होण्याचा वेग फार कमी लेखला आहे आणि त्यामुळे साठवणक्षमतेचा काळ जास्त धरला गेला आहे.
त्यामुळे तयार झालेली साठवणक्षमता अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने कमी होत आहे. वेगाने घटत जाणाऱ्या साठवणक्षमतेमुळे अप्रिय परिणाम लवकरच होऊ घातले आहेत
परिणाम
जेव्हा धरण गाळाने भरून जाते तेव्हा पुरवठा कमी होत जातो. पिकांना हळूहळू कमी पाणी मिळायला सुरूवात होते. सिंचनावरील निव्वळ पेरणी क्षेत्रफळात घट होत जाते. घटलेल्या क्षेत्रफळातील शेतकरी पाण्यासाठी पावसावर किंवा भूजलावर अधिकाधीक अवलंबून राहतात. त्यामुळे त्यांचा अति-उपसा केला जातो. पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होतो, ज्यामुळे शेतकऱ्याच्या मिळकतीवर परिणाम होतो. शेतकऱ्याची मिळकत कमी होते कारण कर्ज, पिक विमा यांसाठी पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. अजून बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे पर्यावरणीय बदल रोखण्यासाठी योजलेली कोणतीही उपाययोजना गाळांनी भरलेल्या धरणांमुळे यशस्वी होणार नाही.
गाळ जमा होण्याच्या वेगातील अभ्यासातून पुढे आलेल्या गंभीर त्रुटी लक्षात घेता, ही शक्यता आहे की पुर नियंत्रणासाठी निर्माण करण्यात आलेल्या धरणांची ती क्षमता मोठ्या प्रमाणात घटलेली असू शकते. त्यामुळे धरणाच्या खालच्या बाजूला येणाऱ्या पुरांत मोठी वाढ झाली आहे. भरूच २०२०, केरळ २०१८ आणि चेन्नई २०१५ ही अशा पुरांची उदाहरणे म्हणता येतील. भविष्यात देशातील २०५० पर्यंत वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी देणे अवघड होईल. मोठ्या प्रमाणात पिके घेणे, शाश्वत शहरांची निर्मीती किंवा विकास कायम राखणे पाण्यावाचून अवघड होईल. त्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
(‘द हिंदू’ या दैनिकातील जे. हर्षा यांच्या ‘The Problem of ageing dams’ या लेखाचा स्वैरानुवाद)