भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन हिच्या कुटुंबियांची भेट घेतल्यामुळे या प्रकरणाला अजून हवा मिळाली आहे. दिशा सालियन हिचे आई वडील माध्यमांशी बोलताना भावूक झाले होते. आम्हाला जगू द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्यांसह दिशा सालियनच्या आई वडिलांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दिशा सालियनच्या आई वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केला आहे. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी माध्यमांद्वारे आवाहन केले. मुलीच्या आत्महत्येबाबत पोलिसांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना सगळी माहिती दिली आहे. मुलीच्या आत्महत्येवर उगाच राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राजकीय नेत्यांकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे आम्हाला खूप त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व राजकारणामुळे आमच्याही मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे ते म्हणाले. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास आरोप करणाऱ्या नेत्यांना जबाबदार ठरवण्यात यावे असेही त्यांनी म्हटले आहे. आम्हाला जगू द्या आणि तुम्हीही जगा अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे. आमच्या मुलीची नाहक बदनामी होत असून हा प्रकार थांबला पाहिजे अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
उत्तराखंड: गाडी दरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू
‘संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?’
हर्षच्या हत्येनंतर विहिंप आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार
‘दिशा सालियनला घरी आणण्यासाठी वापरलेली काळी मर्सिडीज सचिन वाझेची?’
या प्रकरणाची चर्चा करणे थांबवायला हवी असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. दिशाच्या आई-वडिलांनी महिला आयोगाला आणि मला पत्राद्वारे तक्रार अर्ज दिला आहे. या पत्रावर योग्य ती कारवाई करू असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.