भाजपच्या कार्यक्रमात का गेलात म्हणत भावजयीला बेदम मारहाण करणाऱ्या वैजापूरच्या शिवसेना आमदाराविरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच आमदार बोरनारे यांचा राजीनामा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीने केली आहे.
या प्रकरणी आज सोमवारी भाजप महिला मोर्चाचे शिष्टमंडळ विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि आयजी याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
दोन दिवसांपू्वी एका भाजपच्या कार्यक्रमाला आमदाराचे चुलत भाऊ आणि भावाची बायको गेले होते.भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती का लावली, या गोष्टीचा राग मनात धरत आमदार रमेश बोरनारे यांच्यासह दहा जणांनी चुलत भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. त्यामुळे या घटनेचे राजकीय तसेच सामाजिक पडाद उमटत आहेत.
आमदार बोरनारे यांच्यावर ३०७ हे कलम लावण्यात यावे. मारहाण झालेल्या महिलेला दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ठाण्यात बसवून ठेवले. एवढेच नाही तर रुग्णालयात उपचारासाठी तीन तास ताटकळत ठेवले. हे सगळे असताना तिच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा आमदाराच्या दबावाखाली दाखल करण्यात आला. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची ही प्रक्रिया पंधरा मिनिटातच झाली. तिने जेव्हा तक्रार केली तेव्हा तिला ताटकळत ठेवले आणि तिच्यावर लगेच गुन्हा दाखल झाला असा प्रश्न भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष माधुरी अदवंत यांनी केला आहे.
हे ही वाचा:
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या
लालूप्रसाद यादवांच्या शिक्षेवर आज सुनावणी
मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाचा प्रश्न ‘केंद्र’स्थानी
न्यायालयाच्या बाहेर वाहनांमध्ये बसून नोटरी व्यवसाय नको!
तसेच वैजापूर येथील भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांनी वैजापूर पोलिसांनी भेट घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींकडून महिलांना मारहाण होत असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांवरही दबाव टाकत महिलेवर ऍट्रॉसिटीची शहानिशा न करता गुन्हा दाखल केला, यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका भाजपाने मांडली आहे.