गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरू आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या हे राज्यातील ठाकरे सरकारच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत असून त्या संदर्भात तपास यंत्रणांकडे तक्रार करत आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेत किरीट सोमैय्यांना लक्ष करायला सुरुवात केली आहे. किरिट सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत करत असून त्या विषयी तक्रार करणार असल्याचे ते सांगतात.
एकीकडे हा राजकीय कलगीतुरा रंगलेला असतानाच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांची भेट घेतली आहे. मुलुंड येथील सोमय्या यांच्या निवास्थानी ही भेट पार पडली.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा
शिवनेरीवर बाळ शिवबासाठी पाळणा जोजवला
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..
देवेंद्र फडणवीस हे आज ठाणे शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काही विकास कामांचे उद्घाटन केले असून शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. तर परतीच्या प्रवासात तिथे किरीट सोमय्या यांना भेटण्यासाठी गेले. मुलुंड येथील सोमय्या यांच्या निवासस्थानी फडणवीस पोहोचल्याने राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पंधरा मिनिटे चर्चा झाली.
या भेटी संदर्भात किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बातचीत करताना असे सांगितले की फडणवीस आणि त्यांच्यात पुढील रणनीती संदर्भात चर्चा झाली. तुमच्या पाठीशी पक्ष १००% उभा आहे. त्यामुळे कसलीही काळजी करण्याचे कारण नाही असे फडणवीस यांनी सोमय्यांना आश्वस्त केले आहे. तर येत्या काळात आणखी काही प्रकरणे बाहेर काढण्याचे सूतोवाचही सोमय्या यांनी केले आहे.