महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असं राजकीय युद्ध रंगलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत सुशांतसिंह याच्या प्रकरणाच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे. महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले.
भाजपच्या आरोपांमुळे दिशा सालियान हिच्या चारित्र्याचे हनन होत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विनंती आहे की, यावर त्यांनी कारवाई करावी, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनाही महिला म्हणून यात लक्ष घालावे असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मृत्यूनंतर अशी बदनामी करणे महाराष्ट्राला शोभत नाही, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. अन्वय नाईक यांचे कुटुंबीय न्याय मागत आहेत. भाजपच्या काळात तर त्यांना न्याय देता आला नाही. ज्या सीबीआयला केस दिली होती त्याचे काय झाले? ते सांगा, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. तुम्हाला आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचं आहे ते लावा. तुमच्या धमक्यांना घाबरत नाही, असे संजय राऊत म्हणाले. रिश्ते में हम आप के बाप लगते है आणि बाप काय असतो हे तुम्हाला दिसेल, असेही संजय राऊत म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांना तुम्ही खंडणीखोर बनवलं आहे. ती तुमची साधनं झाली आहेत, असे बोलून त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांवर टीका केली.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..
संजय राऊत यांनी यावेळी किरीट सोमय्या यांच्यावर देखील टीका आणि आरोप केले. पालघरला येऊर गावात सोमय्यांचा मोठा प्रोजेक्ट सुरू असल्याचे ते म्हणाले. २६० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या नावाने हा प्रकल्प सुरू आहे. तर पत्नी मेधा किरीट सोमय्या या प्रकल्पाच्या डायरेक्टर आहेत. या प्रकल्पात ईडीच्या डायरेक्टरचे किती पैसे आहेत? अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.