एनआयएने केला एफआयआर दाखल
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती आता समोर आली आहे. भारतात अतिरेकी कारवाया करण्यासाठी तो सध्या तयारी करत असून दाऊदने एक स्पेशल युनिट तयार केल्याची माहिती आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाऊद इब्राहिम विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
भारतातल्या महत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ला करून भारतात दहशत पसरवण्याचा दाऊदचा प्लॅन असून दिल्ली आणि मुंबई या महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य केले जाणार असल्याची माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे. दाऊद इब्राहिम हा भारतात घातपात घडवण्याच्या तयारीत असून यासाठी त्याने एक विशेष टीम तयार केली आहे. ही टीम भारतातील महत्त्वाचे राजकीय नेते, प्रमुख उद्योजक यांना लक्ष्य करणार असल्याचे एफआयआरमधून उघड झाले आहे. तसेच स्फोटके आणि घातक शस्त्रास्त्रे यांच्या सहाय्याने देशामध्ये विविध भागामध्ये हिंसाचार घडवण्याची योजना दाऊद इब्राहिमने आखली असल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएच्या तक्रारीमध्ये दाऊदसहित अनिस शेख, जावेद चिकना, छोटा शकील आणि टायगर मेमन अशा बड्या गुंडांची नावे आहेत.
हे ही वाचा:
‘दिशा सालियनचा पोस्टमॉर्टेम अहवाल कुठे आहे? डॉक्टरांना कुणी दम दिला’
शिवनेरीवर बाळ शिवबासाठी पाळणा जोजवला
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..
या माहितीनंतर तपासयंत्रणा जोरदार कामाला लागल्या असून याच कामासाठी डी गँगला फंडिंग करणाऱ्या पैशांचा तपास करण्यासाठी ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणा अंतर्गत तपासा सुरू केला आहे. दरम्यान ईडीने १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला मनी लाँडरिंगच्या चौकशीच्या संदर्भात शुक्रवारी अटक केली.