राज्यात सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांच्या बहुचर्चित पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आता मुंबई महापालिकेची नोटीस नारायण राणे यांना बजावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटीसमध्ये नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याचे म्हटले आहे. महापालिकेच्या के पश्चिम विभागाकडून ही नोटीस देण्यात आली आहे. बिल्डिंग प्रपोजल विभागाचे पथक आज नारायण राणे यांच्या ‘अधिश’ या बंगल्याची पाहणी करून अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीबाबत तपासणी करेल, अशी नोटीस नारायण राणे यांना पाठवली आहे.
आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी २०१७ मध्ये बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार केली होती. याआधी तक्रार करूनही महापालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याचे संतोष दौंडकर यांनी महापालिकेला कळवले. त्यानंतर महापालिकेने ही नोटीस पाठवली आहे. बंगल्याचं बांधकाम करताना सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
कर्नाटकमध्ये विद्यार्थ्यांना हिजाब, भगवी शाल घालण्यास बंदी
संजय राऊत पुन्हा सोमय्यांवर घसरले
शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल अब्दुल सत्तार यांची चौकशी
किरीट सोमैय्या कोर्लाई गावाकडे रवाना
के -पश्चिम वॉर्डच्या (अंधेरी पश्चिम) अधिकाऱ्याने या नोटीसवर स्वाक्षरी केली आहे. अधिनियम, १८८८ च्या कलम ४८८ अन्वये मालक/ताबाधारकाला नोटीस जारी करण्यात आली आहे. पश्चिम प्रभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक शुक्रवारी जुहू तारा रोड येथील अधिश बंगल्याला भेट देऊन पाहाणी करणार असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.