भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या हे आज अलिबाग येथील कोर्लाई गावाकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि ‘सामना’ च्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्या नावे या गावात १९ बंगले असल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला आहे. याबाबत पाहणी करण्यासाठीच सोमैय्या कोर्लाई गावाला भेट देणार आहेत.
आपल्या दौर्यात रश्मी ठाकरे यांच्या नावावरील १९ बंगले असलेल्या जमिनीची पाहणी करणार असल्याचे सोमैय्या यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सोमैय्या यांनी यापूर्वी या बंगल्यांच्या प्रॉपर्टी टॅक्सचे पेपर जनतेसमोर ठेवले होते. तर रश्मी ठाकरे यांनी या बंगल्याच्या बाबत लिहिलेले पत्र ही सोमैय्या यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून टाकले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत आपण ही माहिती मिळवली असल्याचा दावा सोमैय्या यांनी केला आहे.
हे ही वाचा:
अवघ्या सोळाव्या वर्षी गुजरातच्या बॅडमिंटनपटू तस्मिनने रचला इतिहास
३ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी ‘शून्य’
‘गुरुनानक देवजींची तपोभूमी लाहोर भारतात नाही, हे काँग्रेसने केलेले पाप’
नवाब मलिक लावणार चांदीवाल आयोगासमोर हजेरी
सोमैय्यांच्या या दौऱ्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा राजकीय सामना तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमैय्या यांच्या या भेटीवरून अलिबाग मधील शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोर्लाई गावाचे सरपंच प्रशांत मिसाळ आणि स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी सोमैय्या यांना इशारा दिला आहे. ‘पुण्यात जे घडलं ते अलिबागमध्येही घडेल’ अशी धमकी त्यांनी दिली आहे. पुण्यात सोमैय्या जंबो कोविड सेंटर संदर्भातील घोटाळ्याचा आरोप करत असताना पुणे महापालिकेच्या आवारात त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता.
पण कितीही धमक्या दिल्या तरी आपण मागे हटणार नाही असा इशारा सोमैय्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी कधीही या बंगल्यांबाबत इन्कार केला नाही. आम्ही फक्त ग्रामपंचायतीत जाऊन चौकशी करणार आहोत. बंगले होते ही माहिती मला ग्रामपंचायतीतूनच मिळाली. मग आता बंगले चोरिला गेले की गायब झाले? असा सवाल सोमैय्यांनी केला आहे.