ठाणे आणि दिवा या दोन स्थानकांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित करणार आहेत. तर या सोबतच मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांनाही ते हिरवा झेंडा दाखवतील. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे देखील उपस्थित असणार आहेत.
या दोन अतिरिक्त मार्गिकांचे नियोजन हे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी करण्यात आलेले आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे. देशाच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक कल्याण येथे एकत्रित येवून पुढे मुंबईतील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) च्या दिशेने रवाना होते. कल्याण ते सीएसटीएम दरम्यानच्या चार मार्गांपैकी दोन मार्ग धीम्या लोकलसाठी आणि दोन मार्ग जलद लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी वापरण्यात येत होते. त्यामुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्याची वाहतूक स्वतंत्रपणे करण्यासाठी या दोन अतिरिक्त मार्गांचे नियोजन करण्यात आले.
हे ही वाचा:
चांदीवाल आयोगासमोर नवाब मलिकांचा खुलासा! म्हणाले…
संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा
तळपत्या रवी, सूर्या समोर वेस्ट इंडीजचा संघ ढेर
ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या या दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग बांधण्यासाठी सुमारे ६२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यात १.४ किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, ३ मोठे पूल, २१ छोटे पूल आहेत. तर या मार्गांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीतील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीचा अडथळा दूर होईल. तसेच या मार्गांमुळे शहरात ३६ नवीन उपनगरीय गाड्या सुरू करता येतील.