न्यूज डंका विशेष; सुदर्शन सुर्वे
इमारत कोसळण्याच्या स्थितीत असली तरी त्यावर बांधकाम करून रहिवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार चिंचपोकळीत घडतो आहे. चिंचपोकळीतील पानसरे इमारत सव्वाशे वर्षांपूर्वीची असून आता ती अत्यंत बिकट अवस्थेत आहे, मोडकळीस आलेली आहे. पण बाहेरून विटांचे बांधकाम करून इमारतीवर भार वाढविला जात असल्याने रहिवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत. स्थानिक आमदार यामिनी जाधव यांच्या आमदार निधीतून हे काम सुरू आहे. त्यामुळे उद्या ही इमारत या अतिभारामुळे कोसळली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल स्थानिक उपस्थित करत आहेत.
चिंचपोकळी स्टेशनमधून बाहेर पडल्यावर. स्टेशनच्या बाहेर पश्चिमेला आल्यावर ही पानसरे इमारत आहे. या इमारतीचे २०१८ ला स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. या ऑडिटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, ही इमारत कधीही कोसळू शकेल आणि ही इमारत सी १ कॅटगरित टाकली असून ती ताबडतोब जमीनदोस्त करावी. तरीही या इमारतीत आमदार निधीतून अतिरिक्त बांधकाम केले जात आहे. त्यावरून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इमारतीच्या मागील बाजूस विटांच्या सहाय्याने गॅलरी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार वाढेल आणि आधीच गलितगात्र अवस्थेत असलेली ही इमारत कोसळेल अशी भीती रहिवाशी व्यक्त करत आहेत. रहिवाशांचे म्हणणे आहे की, ‘हे नियमबाह्य असून ही इमारत कधीही कोसळेल. मोडकळीस आलेल्या इमारतीचे भार वाढवण्याचे नियमबाह्य काम आमदार फंडातून होतेय. जर ही इमारत कोसळली तर याची जबाबदारी स्थानिक आमदार यामिनी जाधव घेणार का?’
या इमारतीतील जुने रहिवासी डॉ. चंद्रमोहन पोतदार म्हणतात की, हे वाढीव बांधकाम आहे. विटांचे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. ते बांधकाम करून प्रत्येकाला किचनची जागा करून देत आहेत. पण या बांधकामामुळे इमारतीवर किती भार येईल याचा विचार का होत नाही. कार्यकारी अभियंते याला जबाबदार आहेत. आम्ही इमारतीच्या अवस्थेबद्दल सगळी माहिती त्यांना कळविली होती. पण तरीही इकडच्या लाकडी फ्रेम काढून तिथे विटांचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे जीवितहानी होऊ शकेल. याला कोण जबाबदार असेल?
रहिवाशांचे म्हणणे आहे की, कोणालाही या नव्या बांधकामाविषयी कळवलेले नाही किंवा नोटिसही लावलेली नाही. बाल्कनींचे रिपेअरिंगचे काम न करता त्या जागेत नवीन बांधकाम केले आहे. लाकडी फ्रेमच्या जागी पक्क्या विटांचे बांधकाम करून बाल्कनीचा एरिया वाढवला आणि तिथे किचन करण्यात आले आहे.
२०१८ ला या इमारतीचे ऑडिट केलेले आहे आणि याची प्रत गृहनिर्माण मंत्री, आयुक्त, सहमुख्य अधिकारी – वांद्रे, कार्यकारी अभियंता – काळाचौकी, अग्निशमन अधिकारी, पोलीस आयुक्त या सर्व संबंधितांना पाठवली आहे, असेही डॉ. चंद्रमोहन पोतदार यांनी सांगितले. यात अशी विनंती केलेली आहे की ही इमारत १२५ वर्षे जुनी असून अतिशय धोकादायक व मोडकळीस आलेल्या या इमारतीची दुरुस्ती करण्यात येऊ नये.
सदर इमारतीचे बांधकाम आरसीसी नसून मोठमोठ्या लाकडी भालांवर उभी केलेली आहे. सदर इमारत मूळची २ मजली होती त्यानंतर एक मजला वाढविण्यात आला आहे. हा मजला वाढवून अंदाजे ६० वर्षे झालीत. त्यावेळेस तळमजल्याला पाव इंच जाडीच्या १० फूट उंचीच्या लोखंडी प्लेट घालून प्रत्येक मजल्याला आधार दिला होता. आता या पट्ट्या गंज पकडून वाकल्या आहेत. याचाच अर्थ इमारतीचा भार आता या लोखंडी पट्ट्यांवर आला आहे. हे सिद्ध होते. काही जणांच्या लाकडी भालांना वाळवी लागली आहे. शौचालयाचा भाग अतिशय धोकादायक अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत इथले रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहत आहेत, इमारतीच्या या दुरवस्थेबाबत रहिवासी सांगत आहेत.
सगळ्यात कहर म्हणजे पावसाळ्यात पाणी तुंबून तळमजल्यावरील घरात जमीनीतून गटाराचे सांडपाणी येते. हे सांडपाणी पावसाचा जोर कमी होत नाही तोपर्यंत ३-३ दिवस घरातून जात नाही. यावरून लक्षात येईल की या इमारतीचा जमीनीचा मूळ पाया किती कमकूवत आणि ठिसूळ झालेला आहे, असे इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने सांगितले.
म्हाडाचे वास्तुरचनाकार रूपारेल यांनी २००७ च्या दरम्यान या इमारतीची दुरुस्ती करण्याची मर्यादा संपलेली आहे, असा शेरा मारला आहे. म्हाडानेही 88(3) च्या ३ वेळा नोटीसा दिलेल्या आहेत. ३० एप्रिल २०२१ ला महानगर पालिकेनी या इमारतीच्या रहिवाशांना नोटीस पाठवली. तुम्ही सूचनांचे पालन न केल्यास तुमच्यावर अधिनियम 1988 च्या कलम 353(b) 471 नुसार गुन्हा असेल आणि पुढील कोणतीही सूचना न देता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. महानगर पालिका आम्हाला नोटीसा पाठवतात. तर म्हाडाचे काम आहे की ट्रान्सिट कॅम्प देणे. त्यासाठी इथल्या रहिवाशांनी पाठपुरावाही केलेला आहे. परंतु याकडे चुकूनही लक्ष म्हाडाने दिले नाही आणि ही कॉपी रिमाइंडर म्हणून म्हाडाचे एक्सिक्युटिव्ह इंजीनिअर, काळाचौकी यांनासुद्धा पाठवली आहे.
बिल्डिंगचे स्ट्रक्चर हे संपूर्ण खराब अगोदरच आहे. स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट आहे की ही बिल्डिंग कधीही कोसळेल ती ताबडतोब पाडून टाका. तरीही या बांधकामाला म्हाडाने परवानगी दिली कशी. या धोकादायक इमारतीसाठी आमदार फंडातील पैशाचा दुरुपयोग होतोय, तरी यावर त्वरित कारवाई करावी असे इथल्या रहिवाशांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
अवघ्या सोळाव्या वर्षी गुजरातच्या बॅडमिंटनपटू तस्मिनने रचला इतिहास
३ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी ‘शून्य’
संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
नवाब मलिक लावणार चांदीवाल आयोगासमोर हजेरी
यानंतर न्यूज डंकाच्या टीमने आमदार यामिनी जाधव यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी फोन उचलला नाही.
यासंदर्भात या विभागातील डेप्युटी इंजीनियर कलीम शेख यांच्याशी न्यूज डंकाने संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, पुनर्विकासासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. आता त्याबाबत निर्णय होईल. पण तिथे सध्या आमदार निधीतून सुरू असलेल्या कामकाजाबाबत आम्हाला माहीत नाही.