केंद्रीय लघु व मध्यम उद्योग, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्ला कंपनीच्या गाड्या धावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या वर्षाच्या पूर्वाधात कंपनीचे उत्पादन भारतात चालू होणार असल्याचे सांगितले आहे.
इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या क्षेत्रात टेस्ला ही नामांकित कंपनी असून, पुढील वर्षापासून त्यांची वाहने भारतातही उपलब्ध होऊ शकतील. नितीन गडकरी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, भारतातल्या इतर अनेक कंपनी टेस्ला एवढ्याच प्रगत तरीही कमी दरीतील स्वदेशी बनावटीच्या गाड्या बाजारात आणू इच्छित आहेत. गडकरी यांच्या सांगण्यानुसार, टेस्ला भारतात प्रथम विक्रीला सुरूवात करेल आणि नंतर उत्पादनाला सुरूवात करेल. “पुढील पाच वर्षात भारत इलेक्ट्रिक गाड्यांच्या उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनेल.” असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
हे ही वाचा: टाटा नेक्सन (इव्ही)ची दमदार विक्री
सुरूवातीच्या काळात टेस्ला बाजारात कमी किंमतीच्या गाड्या आणणार असल्याचे कळते. तरीही तयार गाडीची किंमत ₹५५ लाख असल्याचे कळले आहे.
२०१७ मध्ये टेस्ला मोटर्सने भारतात विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र थेट विदेशी गुंतवणूकीच्या कायद्यांतील काही त्रुटींमुळे कंपनीला भारतातील विक्री चालू करायला अधिक वेळ लागला असा दावा, टेस्लाचे सी.ई.ओ इलॉन मस्क यांनी सांगितले.