आज जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ चा उत्साह पहायला मिळत असला तरी भारतात मात्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत. देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून त्यापैकी तीन राज्यांसाठी आज मतदान होणार आहे. उत्तराखंड, गोवा आणि उत्तर प्रदेश अशा तीन राज्यांत आज मतदान पार पडणार आहे. उत्तराखंड आणि गोव्याच्या निवडणुका या एकाच टप्प्यात होणार असल्यामुळे सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान होताना दिसेल. तर भारतातील सर्वात जास्त जागा असलेल्या उत्तर प्रदेश राज्यात आज मतदानाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे.
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान पार पडणार असून गोव्यात ४० आमदार निवडायला जनता मतदान करेल. तर यासोबतच उत्तर प्रदेशात आज ५५ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात ५५ जागांसाठी ५८६ उमेदवार रिंगणात आहेत. तर गोव्यात ४० जागांसाठी ३०१ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. उत्तराखंडमध्ये सर्वाधिक ७० जागांवर ६३२ उमेदवार आपले नशीब आजमावताना दिसतील.
हे ही वाचा:
एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा
धक्कादायक! चंद्रभागेचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक
जागतिक रेडिओ दिन; रेडिओ हे लोकांना जोडणारे उत्तम माध्यम
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची नौदलाच्या साह्याने भर समुद्रात थरारक कारवाई
या तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत असून पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने जोरदार कंबर कसली आहे. तर भाजपाला सर्वार्थाने रोखण्यासाठी विरोधकही चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये निवडणुकीच्या काळात धमाकेदार प्रचार आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या. पण शनिवार, १२ फेब्रुवारी रोजी हा सर्व प्रचार थांबवण्यात आला पुढल्या महिन्यात १० मार्च रोजी या सर्व निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. तेव्हा कोणत्या राज्याने कोणत्या पक्षासाठी कौल दिला हे चित्र स्पष्ट होईल.