एकीकडे कर्नाटक मधील हिजाब वादाचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आता कर्नाटक मधून नवा ‘नमाज’ वाद पुढे येण्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत. कर्नाटकमधील दक्षिण कन्नड आणि बागलकोट जिल्ह्यांमधील शाळकरी विद्यार्थी शुक्रवारच्या दिवशी शाळेत नमाज पठन करत असल्याचे दोन व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आणि या विषयाला तोंड फुटले.
हा व्हिडीओ ज्या घटनेचा आहे ती घटना ४ फेब्रुवारी रोजी घडल्याचे समजते. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळेत काही विद्यार्थी शुक्रवारी नमाज पठन करत असल्याचे पुढे आले आहे. ही घटना उघडकीस आल्यावर स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणात शाळेकडे आक्षेप नोंदवला. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर कर्नाटक सरकारच्या शिक्षण खात्यातील अधिकाऱ्याने या शाळेला भेट दिली. तेव्हा कोणत्याही प्रकारचे धार्मिक कृत्य वर्गात करू नयेत असे आदेश शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिले असल्याचे प्रशासनाकडून करण्यात आले. तर शिक्षण खात्यातील रिसोर्स पर्सनला शाळेत भेट देऊन यासंबंधातील अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश खंडविकास अधिकारी सी लोकेश यांनी दिले आहेत.
हे ही वाचा:
जो बायडन यांचा रशियाला गंभीर इशारा
एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा
जयप्रभा स्टुडिओमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यावरून वाद
Tata IPL 2022 Mega Auction: ‘या’ होत्या पहिल्या दिवशीच्या महत्वाच्या घडामोडी
या विषयावर तोडगा काढण्यासाठी शाळेचे अधिकारी, विद्यार्थी आणि पालक यांच्यात बैठक पार पडली असून आपले पाल्य शाळेच्या परिसरात धार्मिक कृत्य करणार नाहीत असे आश्वासन पालकांनी या बैठकीत दिले असल्याचे लोकेश यांनी सांगितले आहे.
तर दुसरीकडे बागलकोट जिल्ह्यातून अशाच प्रकारची घटना पुढे आली असून सहा विद्यार्थी शाळेत नमाज पढताना आढळून आले आहेत. पण शाळेचा अधिकाऱ्यांनीच विद्यार्थ्यांना यासाठी परवानगी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. शाळेतील काही पालकांनी या संबंधात तक्रार दाखल केली आहे.