अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा पार पडली. अमेरिका आणि रशिया दोन्ही महासत्तांच्या प्रमुखांमध्ये तब्बल एक तासापेक्षा अधिक काळ फोनवरून ही चर्चा झाली असून या चर्चेत जो बायडन यांनी व्लादिमीर पुतीन यांना एक गंभीर इशारा दिल्याची माहिती समोर येत आहे. व्हाईट हाऊसने या संपूर्ण संभाषणानंतर एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसवले तर त्याची कंपनी किंमत रशियाला मोजावी लागेल असा धमकीवजा इशारा जो बायडन यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहेत. जो बायडन आणि पुतीन यांच्यात झालेल्या संभाषणात रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसवले तर संपूर्ण मानव जात त्याची किंमत मोजेल आणि रशियाची प्रतिमा मलिन होईल अशा प्रकारचे प्रतिपादन बायडन यांनी केले आहे. तर अमेरिका त्यांच्या युरोपमधील मित्रांसोबत उभा असून निर्णायक पद्धतीने प्रतिक्रिया देईल असेही त्यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण विषयात अमेरिका एका चर्चात्मक मार्गाने सहभागी व्हायला तयार आहे. पण इतर कोणत्या मार्गाने सहभाग नोंदवायचा झाला तरीही आमची तयारी आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे या इशाऱ्यानंतर युक्रेन विषयात रशिया नेमकी काय भूमिका घेणार? याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा
जयप्रभा स्टुडिओमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यावरून वाद
शेट्टी बहिणींना आणि त्यांच्या आईला न्यायालयाचे समन्स
Tata IPL 2022 Mega Auction: ‘या’ होत्या पहिल्या दिवशीच्या महत्वाच्या घडामोडी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना देखील ही भीती वाटत असून त्यांनी युक्रेन मध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेत परत येण्याचे आवाहन केले आहे. अमेरिके प्रमाणेच इतरही देशांनी आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडण्याचे आणि मायदेशी परतण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध झाले तर परदेशातील नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये या दृष्टीने सर्वच देश प्रयत्नशील दिसत आहेत.
पण जर रशियाने हल्ला केला आणि ही परिस्थिती चिघळली तर २४ ते ४८ तासात अमेरिकन नागरिकांना युक्रेन मधून बाहेर काढणे कठीण होणार आहे. रशिया कोणतीही पूर्वसूचना न देता युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. त्यामुळेच या परिस्थितीत अमेरिकन नागरिक होरपळू नयेत या दृष्टीने अमेरिकेचे सरकार प्रयत्न करताना दिसत आहे.