रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत हजारो लोक रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांनी रशियाचे पुतिनविरोधी नेते ऍलेक्सि नवालनी यांच्या सुटकेची मागणी प्रशासन आणि शासनाकडे केली. या प्रदर्शनात सामील असलेल्या ४७०० प्रदर्शनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रशियामध्ये पुतिनविरोधी नेते ऍलेक्सि नवालनी यांच्यावर सप्टेंबर २०२० मध्ये विषप्रयोग करण्यात आला होता. जर्मनीमधील रुग्णालयातील अथक प्रयत्नातून त्यांचे प्राण वाचवले होते. या विषप्रयोगामागे रशियाच्या सरकारचा हात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. जानेवारी २०२१ मध्ये ऍलेक्सि नवालनी हे रशियामध्ये परतले. मॉस्को विमानतळावरच रशियन प्रशासनाकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या अटकेनंतर रशियाच्या विविध शहरांमध्ये नवालनी यांच्या समर्थनार्थ निदर्शने सुरु झाली. रशियामध्ये असलेल्या ११ प्रमाणवेळांपैकी सर्व शहरांमध्ये निदर्शने सुरु आहेत.
रविवारी झालेल्या मॉस्कोमधील प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निदर्शकांना अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तरीही हजारो निदर्शक मॉस्कोमध्ये निदर्शनासाठी एकत्र आले. प्रदर्शनकर्त्यांच्या अटकेनंतरही नवालनी यांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा मंगळवारी मॉस्कोमध्ये निदर्शने आयोजित केली आहेत.
या प्रदर्शनामुळे पुतीन यांच्या सरकारविरुद्ध अनेक वर्षांनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निदर्शने होताना दिसत आहेत.