पश्चिम बंगालमध्ये निवडणुकी पश्चात उसळलेला हिंसाचार हा देशभर चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला होता. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप समर्थक आणि कार्यकर्त्यांवर केलेले हल्ले संपूर्ण राज्यभर पाहायला मिळाले होते. या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआय तपास करत असून त्यांनी या हिंसाचाराच्या संबंधात तीन जणांना अटक केली आहे.
भाजपा समर्थक बिस्वजीत महेश यांच्या हत्येच्या संदर्भात ही अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल मधील निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात बिस्वजीत महेश या भाजपा समर्थकाचा पश्चिम मेदिनिपुर या ठिकाणी खून झाला होता. याप्रकरणी गेल्या वर्षी ११ नोव्हेंबर रोजी सीबीआयने पाच जणांच्या विरोधात खटला दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात सीबीआयला निर्देश दिले होते.
हे ही वाचा:
मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज
संजय राऊतांचे ‘ते’ पत्र पाहून त्यांची कीव वाटते
ईडीच्या भीतीने संजय राऊतांची आगपाखड
कर्नाटकात जय श्री राम विरुद्ध अल्ला हू अकबर वाद पेटला
गेल्यावर्षी पश्चिम बंगाल येथील निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ४ मे रोजी महेश याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. लोखंडी सळीने त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर त्याला हॉस्पिटलला नेण्यात आले होते पण त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या मते त्याला जेव्हा आणले तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता.
पश्चिम बंगालमध्ये अशा अनेक खुनाच्या, बलात्काराच्या, हिंसाचाराच्या घटना गेल्यावर्षी प्रकाशझोतात आल्या होत्या. या सर्व प्रकरणात पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर आरोप केले जात होते. अगदी केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यापर्यंत या गुंडांची मजल गेली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणात सीबीआय तपास व्हावा असे आदेश १९ ऑगस्ट रोजी कोर्टाने दिले. त्यानुसार या हिंसाचाराच्या घटनांचा तपास सुरू आहे.