अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत भारताने विश्वचषकावर आपलं नाव कोरत इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर ४ गडी आणि १४ चेंडू राखत विजय मिळवला. भारत पाचव्यांदा अंडर १९ विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यात इंग्लंडने सर्वप्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव १८९ धावांत आटोपला.
इंग्लंडकडून जेम्स रियूने ९५ धावांची झुंज दिली. तर जेम्स सेल्स याने नाबाद ३४ धावा केल्या. इंग्लंडचे तीन फलंदाज हे शून्यावर बाद झाले. भारतीय गोलंदाज राज बावा याने ३१ धावा देत ५ बळी घेतले. तर रवी कुमार याने ९ षटकात ३४ धावा देत इंग्लंडचे ४ फलंदाज माघारी धाडले. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा डाव १८९ धावांमध्ये आटोपला.
त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरताच इंग्लंडचा गोलंदाज जोशुआ बोयडनने भारताला पहिला धक्का दिला. सलामीवीर अंगकृष रघुवंशीला त्याने शून्यावर बाद केले. त्यानंतर हरनूर सिंग आणि शेख रशीदने सयमी खेळी करून दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. त्यानंतर हरनूर बाद झाल्यावर शेख रशीद आणि कॅप्टन यश धुलने भारताचा डाव सावरला. रशीदने अर्धशतक झळकावल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. लगेचच यश धुलही आऊट झाला.
त्या समयी इंग्लंडचे पारडे जड होते की काय? असे वाटत असतानाच निशांत सिंधु आणि राज बावाने पाचव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण ६७ धावांची भागीदारी केली. राज बावा आणि कौशल तांबे बाद झाल्यानंतर दिनेश बाना आणि निशांत सिंधुने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला. तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हे ही वाचा:
तीस हजारहून अधिक सापांना जीवनदान देणारा हा ‘स्नेक मास्टर’ आहे कोण? वाचा सविस्तर
आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैगिंग अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी
लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक; व्हेंटिलेटरवर ठेवले
यश धुलच्या नेतृत्वाखालील भारताने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. भारताने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा अंडर १९ विश्वविजेतेपद पटकावले आहे. २००० साली मोहम्मद कैफ, २००८ मध्ये विराट कोहली, २०१२ मध्ये उनमुक्त चांद, २०१८ मध्ये पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखाली भारताने आपले नाव या विश्वचषकावर कोरले होते. आता २०२२ मध्ये यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर १९ विश्वविजेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचला आहे.