देशातील काही नेत्यांकडून अनेकदा संविधान बदलण्याची भाषा केली जाते. पण आता थेट मुख्यमंत्र्यानीच ही भाषा सुरू केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राज्यघटना पुन्हा लिहिण्याबाबत मोहीम सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी ते देशातील अनेक नेत्यांना भेटणार आहेत. “आम्हाला भारतात नवीन राज्यघटना तयार करायची आहे. आता भारतात संविधानाचे पुनर्लेखन करण्याची गरज आहे. मी सर्व नेत्यांना भेटून माझी मते सांगणार आहे, “असे ते म्हणाले आहेत.
राज्यघटनेच्या पुनर्लेखनाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच देशातील इतर नेत्यांची भेट घेणार असून लवकरच देशासाठी लढण्याची घोषणा करणार असल्याचे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचवेळी भाजपचे राज्यसभा खासदार टी.जी. राज्यघटनेच्या पुनर्लेखनाची मागणी करणे चुकीचेच नाही तर डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांच्या भावनेच्याही विरोधात असल्याचे व्यंकटेश यांनी म्हटले आहे.
तेलंगणात भारतीय जनता पक्षाने चंद्रशेखर राव यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. भाजपचे राज्य युनिट अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार यांनी आरोप केला की, “केसीआर यांची अशी योजना आहे कारण ते संसद आणि विधानसभांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या लोकप्रतिनिधींची निवड सहन करू शकत नाहीत. संविधानाची मूलभूत तत्त्वे बदलण्याचा प्रयत्न केला म्हणून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींसारख्या नेत्यालाही निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.” तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
हे ही वाचा:
पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू
माघी गणेशोत्सव का साजरा केला जातो?
दक्षिण आशियातील सर्वाधिक रामसार क्षेत्र भारतात
बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
‘संविधान ही केसीआरची मालमत्ता नाही’
माजी आयपीएस अधिकारी आणि राज्य बहुजन समाज पक्षाचे मुख्य समन्वयक आर.एस.प्रवीण कुमार म्हणाले की, भारतीय राज्यघटना गेल्या ७५ वर्षातील देशाच्या महानतेसाठी ओळखली जाते. केसीआर हे कसे म्हणू शकतात की संविधान बदलण्याची गरज आहे? संविधान ही केसीआरची संपत्ती नाही.