धावत्या मोटारीवर बसून स्टंट करणे दोन जणांना चांगलेच महागात पडले आहे. या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी या मोटारीचा शोध घेऊन दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या दोघांना अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर ‘हिरोगीरी पडली महागात’ असे ट्विट करून मुंबई पोलिसांनी या दोघांच्या माफीचा व्हिडीओ ट्विटर वर प्रसारित केला आहे.
मुंबईच्या वांद्रे – वरळी सी लिंक जवळील रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाच्या धावत्या मोटारीच्या बोनेटवर एक तरुण बसून स्टंटबाजी करीत असल्याचा व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक जण मोटार सुसाट चालवत असून दुसरा तरुण मोटारीच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी करीत होता.
या व्हिडीओची दखल घेत वांद्रे पोलिसांनी या मोटारीचा शोध सुरू केला आणि कुर्ला परिसरातून या दोघांच्या मुसक्या आवळून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. इम्रान अन्सारी (२७), गुलफाम अन्सारी (२५) असे या दोघांची नावे आहेत. वांद्रे पोलिसांनी या दोघांवर मोटार वाहन कायदा कलम २७९ व ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.
हिरोगिरी पडली महागात!
चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीच्या वर्तनाने काहींना वांद्रे पो.स्थानकात जावे लागले.
मित्रांना गाडीच्या बोनेटवर बसू दिल्यामुळे दोन इसमांवर कलम २७९ व ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.#RoadSafety pic.twitter.com/vepwa9wSPd
— Mumbai Police (@MumbaiPolice) February 2, 2022
सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हे दोघे वांद्रे – वरळी सी लिंक रस्त्यावर मोटार घेऊन आले होते, इम्रान अन्सारी हा बोनेटवर बसून हिरोगिरी करीत होता तर गुलफान हा सुसाट मोटार चालवत होता. हा व्हिडीओ अनोळखी व्यक्तीने काढून तो सोशल मीडियावर टाकला होता.
हे ही वाचा:
राहुल गांधीची ‘राष्ट्र’ विरोधी भेदनीति
मालेगाव प्रकरणातील साक्षीदार म्हणाला, आरएसएस नेत्यांची नावे देण्यास भाग पाडले!
गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचे ३८ जवान नदीत वाहून गेल्याचे उघड
वांद्रे पोलिसांनी या दोघांचा माफी मागण्याचा आणि असे स्टंट कोणीही करू नका, असा व्हिडीओ तयार करून मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अपलोड करून हिरोगिरी पडली महागात असे ट्विट केले आहे. या दोघांना जामिनावर सोडण्यात आले आहे.