महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या दोन्ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीनंच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या संदर्भातील माहिती दिली असून यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच थेट लेखी स्वरुपात होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा हा चांगलाच चर्चेचा विषय राहिला आहे. जगभरातील कोविडचे प्रमाण कमी झाले असले तरीही महामारी अद्यापही पूर्णपणे संपलेली नाही त्यामुळे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या ऑनलाइन पद्धतीने होणार की ऑफलाइन यावर प्रश्नचिन्ह होते.
हे ही वाचा:
नगरच्या गिर्यारोहकांचा नाशिक मध्ये मृत्यू
U19 WC: भारताचे निर्विवाद ‘यश’! ऑस्ट्रेलियाला ‘धुल’ चारत अंतिम फेरीत धडक
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
उज्ज्वल निकम म्हणतात, नितेश राणे प्रकरणाचा निष्कारण फुगा केला गेला!
ऑफलाइन न घेता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणीही अनेक विद्यार्थी आणि पालक करताना दिसत होते. पण बोर्डाकडून मात्र ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याच्या संदर्भात सूतोवाच केले जात होते. यावरच आता अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले असून दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर प्रात्यक्षिक परीक्षा या दोन कालावधीत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या सोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतूनच परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे.
बारावीची परीक्षा ४ मार्चपासून, दहावीची १५ मार्चपासून
बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार असून ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत बारावीचे पेपर पार पडणार आहेत. तर १४ फेब्रुवारी पासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. या बरोबरीने प्रात्यक्षिक परीक्षेचा दुसरा टप्पा ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. काही अपरिहार्य कारण असल्यास विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल. तर दहावीची परीक्षा ही १५ मार्चला घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ही ४० टक्के अभ्यासक्रमावर आधारित असेल तर त्यासाठी बाहेरचे परीक्षक न नेमता त्याच शाळेतील परीक्षक नेमले जाणार आहेत.