१९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताचा कर्णधार यश धुल आणि उपकर्णधार शैक रशीद यांच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताला हा विजय साध्य झाला आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी मात केली आहे. अँटिग्वा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय खळीची सुरुवात तशी अडखळत झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. २ बाद ३७ अशी स्थिती असताना भारताचा कर्णधार यश धुल आणि उपकर्णधार शैक रशीद यांनी भारतीय डाव सावरला. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी रचली. ही खेळी भारतीय संघाच्या विजयाचा पाया ठरला.
यश ढूलने ११० धावा करत आपले शतक साजरे केले. पण त्यानंतर तो धावबाद झाला. तर रशीदनेही ९४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अवघ्या सहा धावांनी त्याचे शतक हुकले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २९० धावा धावफलकावर चढवल्या आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २९१ धावांचे लक्ष्य ठेवले.
हे ही वाचा:
अनिल देशमुख म्हणाले की, पोलिसांच्या पोस्टिंगची यादी अनिल परब देत असत!
वाझेच्या नियुक्तीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून थेट आदेश!
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
उज्ज्वल निकम म्हणतात, नितेश राणे प्रकरणाचा निष्कारण फुगा केला गेला!
भारतीय संघाचे हे आव्हान पेलताना ऑस्ट्रेलियाचा संघ पुरता ढेपाळला. ऑस्ट्रेलियन संघाकडून लॅचलन शॉ याने अर्धशतकी खेळी केली. तर कोरी मिलर याने ३८ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया संघाकडून कोणीही प्रभावपूर्ण खेळी करू शकले नाही. भारतीय गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलिया संघ १९४ धावांवरच सर्व बाद झाला. भारतीय संघाकडून विकी ओसत्वाल याने ३ गडी वाद केले. तर रवी कुमार आणि निशांत सिंधू यांनी २ विकेट्स घेतल्या.
या विजयानंतर भारतीय संघ १९ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात अंतिम फेरीत दाखल झाला असून त्यांचा सामना इंग्लंड संघाशी होणार आहे.