केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू असून काही प्रमाणात शैक्षणिक नुकसानदेखील झाले आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रासाठी कोणत्या नव्या घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी २०० चॅनेल्सची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
कोरोनाकाळात अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. या चॅनेल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. त्यासाठी टीव्ही, रेडीओ आणि डिजिटल मीडियाचा वापर केला जाणार आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान ई- विद्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘एक क्लास, एक टीव्ही चॅनेल’ या मोहिमेचा विस्तार आता करण्यात आला आहे. पूर्वी या मोहिमेअंतर्गत पहिली ते बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एक असे १२ टीव्ही चॅनेल्स सुरू करण्यात आले होते. मात्र आता त्यांची संख्या आता २०० पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक राज्याला आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करता येऊ शकेल. ज्याचा जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थी लाभ घेऊ शकतील.
स्किल इंडिया मिशनच्या माध्यमातून आणि सरकारी योजनांतर्गत कुशल कामगार तयार करण्यासाठी युवाशक्ती बनविण्याचे काम केले जाईल, असे त्या म्हणाल्या. डिजिटल विद्यापीठांची निर्मिती करण्यात येणार असून शाळांमधील प्रत्येक वर्गात टीव्ही लावण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा:
Budget 2022: आज सादर होणार अर्थसंकल्प; या क्षेत्रांना मिळू शकते प्राधान्य
Budget 2022: विकास दर ९.२%, महागाईत घट! काय सांगतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल?
Budget 2022 : अर्थव्यवस्थेला मिळणार नवी ‘गती शक्ती’
Budget 2022: ‘६० लाख नवे रोजगार निर्माण करणार’
अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी सांगितलं की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये पुढील २५ वर्षांची ब्ल्यू प्रिंट असेल. देशाच्या आर्थिक परिस्थितीला आणखी बळकट करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.